Pahalgam Terror Attack News: जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी भारत “पाकिस्तानइतका क्रूर” नाही असे प्रतिपादन करताना म्हटले की, आपण पाणी थांबवू शकतो, “पण आपण त्यांना मारणार नाही”.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम जिल्ह्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत १९६० चा सिंधू पाणी करार थांबवल्याचा संदर्भात प्रतिक्रिया देताना अब्दुल्ला यांनी हे विधान केले आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना फारूख अब्दुल्ला म्हणाले, “भारत हा गांधींचा देश आहे, आपण त्यांना (पाकिस्तानला) धमकी दिली आहे की, आपण पाणी थांबवू, पण आपण त्यांना मारणार नाही. आपण त्यांच्याइतके क्रूर नाही.”

सर्वात मोठे नुकसान…

“सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी झाली तेव्हा जम्मू-काश्मीरमधील लोकांना विश्वासात घेतले गेले नाही. या करारामुळे जम्मू-काश्मीरचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. मी केंद्र सरकारला आवाहन करतो की, त्यांनी हे पाणी जम्मूच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी योजना सुरु करावी”, असे अब्दुला पुढे म्हणाले.

दरम्यान फारूख अब्दुल्ला यांनी पहलगाममधील पर्यटकांची भेटही घेतली आणि काश्मीर हा भारताचा भाग होता आणि नेहमीच राहील असे प्रतिपादन केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्वात मोठा संदेश म्हणजे पर्यटक “घाबरलेले नाहीत”, असे एएनआय वृत्तात म्हटले आहे.

आपण एक दिवस महासत्ता बनू

“भीती पसरवणारे लोक हरले आहेत. ते (दहशतवादी) हरले आहेत. आज हे सिद्ध झाले आहे की, आपण घाबरणार नाही. काश्मीर भारताचा भाग होता आणि नेहमीच राहील. लोकांना दहशतवाद संपवायचा आहे. आपल्याला प्रगती हवी आहे. आपल्याला पुढे जायचे आहे. आपण एक दिवस महासत्ता बनू,” असेही अब्दुल्ला म्हणाले.

भारताची पाकिस्तानवर कारवाई

पहलगाम हल्ल्यानंतर कठोर उपाययोजना म्हणून, भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. अटारी सीमा बंद केली असून, पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा रद्द केले आहेत. याचबरोबर अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल आणि एक्स हँडल्सवर भारतात बंदी घालण्याची कारवाई सुरू केली आहे. दुसरीकडे पाकिस्ताननेही भारतीय विमान कंपन्यांसाठी त्यांची हवाई हद्द बंद केली आहे. याचबरोबर पाकिस्तानी राजकीय नेते भारताविरोधात चिथावनीखोर विधाने करत आहेत.