वृत्तसंस्था, नवी दिल्ली : अॅम्नेस्टी इंटरनॅशनल इंडिया संस्थेचे माजी प्रमुख आकार पटेल यांना बंगळुरू विमानतळावरून अमेरिकेस निघालेले असताना अधिकाऱ्यांनी मनाई केली. त्याविरुद्ध त्यांनी बुधवारी दिल्ली न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागास (सीबीआय) नोटीस बजावली असून, गुरुवारी त्यावर सुनावणी करण्यात येईल.
मुख्य महानगर दंडाधिकारी पवनकुमार यांच्याकडे दाखल केलेल्या याचिकेत केंद्रीय अन्वेषण विभागास (सीबीआय) आपल्याविरुद्धची ‘लूकआऊट नोटीस’ रद्द करण्याची मागणी पटेल यांनी केली आहे. ही नोटीस योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे बजावण्यात आलेली नसून, मनमानी कृत्य असल्याचेही पटेल यांनी याचिकेत नमूद केले आहे.
या याचिकेत नमूद केले आहे, की पटेल यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क, मिशिगन, बर्कले विद्यापीठांत विविध व्याख्याने, परिसंवादात सहभागी व्हायचे होते. गुजरातचे भाजपचे आमदार पूर्णेशभाई मोदींनी दाखल केलेल्या खासगी तक्रारीवरून सुरतच्या अतिरिक्त व सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयात खटला दाखल आहे. या न्यायालयाने १९ फेब्रुवारी रोजी पटेल यांना परदेशी जाण्यास परवानगी दिली आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाने ‘अॅम्नेस्टी’विरुद्ध परकीय चलन विनियोग नियमन कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन केल्याबद्दल खटला दाखल केला असून, आकार पटेल यांचे नाव सीबीआयच्या ५ नोव्हेंबर २०१९ च्या प्राथमिक तपास अहवालात नमूद केले आहे. त्यांना या खटल्यात एकदा पाचारण करण्यात आले होते.