Four Stars of Destiny Book Controversy: देशाचे माजी लष्करप्रमुख निवृत्त जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या एका पुस्तकाला अद्याप केंद्राची परवानगी मिळालेली नाही. डिसेंबर २०१९ ते एप्रिल २०२२ या काळात त्यांनी देशाच्या लष्करप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळली होती. मराठमोळे अधिकारी जनरल नरवणे यांनी जवळपास वर्षभरापूर्वी हे पुस्तक लिहून प्रकाशकांकडे सुपूर्द केलं आहे. पण त्याच्या प्रकाशनाला नरेंद्र मोदी सरकारकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. या पुस्तकातील काही नोंदींवर संरक्षण मंत्रालयाला आक्षेप असून त्याचा आढावा घेण्यासाठी पुस्तकाच्या प्रकाशनाला परवानगी देण्यात आलेली नाही.
हिमाचल प्रदेशच्या कसौली भागात आयोजित खुशवंत सिंग साहित्य महोत्सवासाठी जनरल नरवणे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांना वर्षभरापासून प्रकाशनाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्यांच्या ‘Four Stars of Destiny’ पुस्तकाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा त्यांनी याचा निर्णय प्रकाशक आणि संरक्षण मंत्रालयाकडे प्रलंबित असल्याचं नमूद केलं.
काय म्हणाले जनरल मनोज नरवणे?
“माझं काम होतं पुस्तक लिहून प्रकाशकांकडे देणं. माझ्या पुस्तकासाठी संरक्षण मंत्रालयाची परवानगी घेण्याची जबाबदारी प्रकाशकांची होती. त्यांनी ते पुस्तक परवानगीसाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठवलं. त्या पुस्तकाचा मंत्रालयाकडून आढावा घेतला जात होता. त्याला एक वर्ष उलटलं आहे. अजूनही पुस्तकाचा आढावा घेतला जात आहे”, असं जनरल नरवणे यावेळी म्हणाले.
शिवाय, प्रकाशक व संरक्षण मंत्रालय पुस्तकासंदर्भात एकमेकांच्या संपर्कात असल्याचंही ते म्हणाले. “या सगळ्यात पुस्तकाच्या प्रकाशनाला परवानगी कधी मिळणार, याचा पाठपुरावा करण्याचं काम माझं नाही. आता या पुस्तकासंदर्भातला निर्णय प्रकाशक व संरक्षण मंत्रालयाचा आहे. पण मला पुस्तक लिहिताना मनस्वी आनंद झाला. आता संरक्षण मंत्रालयाला जेव्हा योग्य वाटेल, तेव्हा ते पुस्तकाला प्रकाशनाची परवानगी देतील”, असं नरवणे यांनी नमूद केलं.
मनोज नरवणेंच्या पुस्तकात असं काय आहे?
फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या नरवणेंच्या पुस्तकात देशाच्या काही संवेदनशील लष्करी कारवाया आणि त्यामागच्या राजकीय घडामोडींबाबत उल्लेख असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही महिन्यांपूर्वी पुस्तकाच्या प्रस्तावनेचा काही भाग व्हायरल झाला होता. त्यात अग्नीवीर योजनेसंदर्भात करण्यात आलेल्या दाव्यांची मोठी चर्चा झाली होती. विशेष म्हणजे नरवणे लष्करप्रमुख असतानाच २०२०मध्ये गलवान प्रांतात चीनी सैन्याने भारतीय जवानांवर हल्ले केल्याची घटना घडली होती.
चीनी सैन्याची घुसखोरी व मध्यरात्रीची चर्चा!
चीनी सैन्यानं लडाखच्या रेचिन ला पासमधून घुसखोरी केली त्यादिवशी म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२० रोजी मध्यरात्री नरवणेंनी तत्कालीन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याशी केलेल्या चर्चेचा उल्लेख आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना याबाबत माहिती दिली असता ‘तुम्हाला जे योग्य वाटेल, ते करा’, असे निर्देश मोदींनी दिल्याचं पुस्तकात म्हटलं आहे.
अग्नीवीर योजनेचं वास्तव?
नरवणेंच्याच काळात म्हणजेच जून २०२२ मध्ये देशात महत्त्वाकांक्षी ‘अग्नीवीर’ योजना लागू करण्यात आली. मात्र, तेव्हा लष्कराने अग्नीवीर योजनेतील नियुक्त तरुणांपैकी ७५ टक्के तरुणांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव मांडला होता. पण सरकारने हे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत खाली आणलं. शिवाय, या जवानांना फक्त २० हजार रुपये वेतन देऊ केलं गेलं. पण लष्करानं पाठपुरावा केल्यानंतर ते ३० हजारांपर्यंत वाढवण्यात आलं.