नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला आणि ग्रामीण भागाची नस ठाऊक असलेला गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा दुसरा नेता पक्षात नाही. शेतकरी, शेतमजूर, मागास व भटक्या जातीजमाती आणि विपन्नावस्थेतील समाजघटकांसाठी कार्य करण्याचा त्यांना कायम ध्यास होता. प्रदीर्घ राजकीय कारकीर्द गाजविलेले मुंडे हे कायमच माझे नेते होते. मुंडे जेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा मी भाजयुमोचा नागपूर अध्यक्ष होतो. ते उपमुख्यमंत्री असताना मी सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. मुंडे आणि मी समान पातळीवरील नेते नव्हतो. ते मला राजकारणात ज्येष्ठ होते व त्यांचे नेतृत्व मला कायमच मान्य होते. त्यामुळे भाजपच्या इंदूर येथील अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी घोषणा झाली, तेव्हा लालकृष्ण अडवाणी यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना मी वाकून नमस्कार केला होता. दिल्लीच्या राजकारणात मला वरचे पद मिळूनही त्यांची ज्येष्ठता जपण्याचा माझा कायमच प्रयत्न राहिला.
मुंडे यांचे कर्तृत्व जवळून पाहण्याची संधी मला मिळाली. भाजप सरचिटणीस, विधिमंडळ नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री, लोकसभेतील उपनेते व आता ग्रामविकास मंत्री हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा उंचावत गेलेला आलेख आहे. भाजपला शक्तिशाली करण्यात आणि जनमान्यता मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अतिदुर्गम व मागास भागात कामे करताना कशाला प्राधान्य द्यायचे, ते मुंडे नेमकेपणाने सांगू शकत होते. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतराच्या वेळी त्यांनी घेतलेली भूमिका सर्वाना प्रेरणादायी होती. ते झुंजार नेते होते. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने त्यांनी राज्यात झंझावात उभा केला आणि तत्कालीन काँग्रेस सरकारच्या तोंडचे पाणी पळविले होते. राजकारणातील गुन्हेगारीकरणाविरोधात त्यांनी तोफा डागल्या होत्या. त्यामुळे राज्यात १९९५ मध्ये सत्तांतर झाले.  पक्ष हा एक परिवार आहे, असे आमचे संस्कार आहेत. या परिवाराचे नेतृत्व अकाली जाते, तेव्हा आभाळच फाटते. पक्षातील एक उमदा, प्रेरणादायी व स्फूर्तीचा झरा मिटला आहे. दिल्लीतील राजकीय कारकीर्द बहरत असताना दोन महत्वाच्या खात्यांची जबाबदारी आमच्या दोघांवर टाकण्यात आली. कोणतेही काम करताना तळागाळातला शेवटचा माणूस हाच त्यांचा केंद्रबिंदू होता. संपूर्ण देश सुखी, समृध्द व संपन्न करण्याचा त्यांचा ध्यास होता. नवे काही करायचे स्वप्न आम्ही पहात होतो. पण त्या मनसुब्यांवर आज पाणी फिरले आहे.

गोपीनाथ मुंडे यांचे निधन दुर्देवी आणि धक्कादायक आहे. त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या संघर्षांला आता कोठे खऱ्या अर्थाने यश येऊ लागले होते. त्यांचे व माझे अनेक वर्षांचे संबंध होते. महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने जाण असलेले व्यक्तिमत्व होते. राजकारण,समाजकारण यांची उत्तम जाण आणि राजकारणाच्या पलीकडे संबंध जपण्याच्या वृत्तीमुळे सर्वच पक्षांमध्ये त्यांचे उत्तम संबंध होते.
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

पदवी प्रमाणपत्राची  प्रसिद्धी राहून गेली..
पुणे :गोपीनाथ मुंडे यांच्या पदवीचा वाद काँग्रेसने उकरून काढल्यानंतर मुंडे यांना पुणे विद्यापीठाने दिलेले पदवी प्रमाणपत्र मंगळवारी प्रसिद्ध केले जाणार होते. मात्र, सकाळीच मुंडे यांचे निधन झाले आणि त्यांच्या प्रमाणपत्राची प्रसिद्धी अखेर राहून गेली.केंद्रीय मंत्रिमंडळातील स्मृती इराणी यांच्या शिक्षणाबद्दलचा वाद सुरू झाल्यानंतर पाठोपाठ मुंडे यांच्याही पदवीचा वाद काँग्रेसने सुरू केला आहे.  खासदार शिरोळे यांनी सोमवारी पुणे विद्यापीठाशी संपर्क साधून मुंडे यांचे विधी शाखेच्या पदवीचे प्रमाणपत्र मिळवले होते. मुंडे यांनी पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज येथून हे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी १९७६ मध्ये विधी शाखेची पदवी संपादन केली. मुंडे यांच्या शिक्षणाबाबतचा वाद पूर्णपणे थांबवण्याकरिता हे प्रमाणपत्र मुंडे यांना मंगळवारी पाठवले जाणार होते.