दहशतवादविरोधी पथकाची लाहोरमध्ये कारवाई

लाहोर : मुंबई हल्ल्याचा सूत्रधार असलेला कुख्यात दहशतवादी व जमात उद दवाचा प्रमुख हाफिज सईद याला पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या दहशतवाद विरोधी पथकाने  बुधवारी अटक केली असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सईद याच्यावर पाकिस्तानात अनेक खटले दाखल असून तो दहशतवाद विरोधी न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी लाहोर येथून गुजरावालाकडे जात असताना त्याला अटक करण्यात आली. त्याला अतिसुरक्षित अशा कोटलखपत तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्याची जमात उद दवा ही संघटना लष्कर ए तोयबाची शीर्षस्थ संस्था असून २००८ मध्ये मुंबईतील हल्ले लष्कर ए तोयबा या संघटनेने केले होते त्यात १६६ लोक ठार झाले होते. अमेरिकेच्या अर्थ खात्याने सईदला यापूर्वी जागतिक दहशतवादी घोषित केले होते. २०१२ पासून त्याला पकडण्यासाठी पुरेशी माहिती देणाऱ्यास १ कोटी डॉलर्स इनाम जाहीर करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने नेहमीच दबाव ठेवलेला असल्याने पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अनेकदा लष्कर ए तोयबा, जमात उद दवा, फलाह ए इन्सानियत फाउंडेशन या संघटनांची चौकशी केली आहे पण या सर्व कारवाया जगाला दाखवण्यापुरत्या असतात यात शंका नाही. दहशतवाद विरोधी पथकाने अर्थपुरवठय़ाच्या मुद्दय़ावर हाफिज सईद याच्यावर २३ गुन्हे दाखल केले असून त्याच्या १२ साथीदारांवर ही संशयित  दहशतवाद्यांना  पैसा पुरवल्याचे आरोप आहेत.

सोमवारी लाहोर येथील दहशतवाद विरोधी न्यायालयाने सईद व इतर तिघांना मदरसासाठी जमिनीचा बेकायदेशीर वापर केल्याच्या आरोपाखाली दाखल खटल्यात अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. दहशतवाद विरोधी न्यायालयाचे न्यायाधीश जावेद इक्बाल वारीच यांनी सईद व त्याचे साथीदार हाफिज मसूद, अमीर हमझा, मलिक झफर यांना ३ ऑगस्टपर्यंत प्रत्येकी ५० हजारांच्या हमीपत्रावर अटकपूर्व जामीन दिला.

३ जुलैला जमात उद दवाच्या तेरा जणांवर दहशतवादाला अर्थपुरवठा व काळा पैसा या आरोपाखाली दहशतवाद विरोधी कायदा १९९७ अन्वये गुन्हे दाखल केले होते. त्यात सईद, नईब अमीर अब्दुल रहमान मक्की यांचा समावेश आहे.