आज (दि. २५ मे) लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याचे मतदान होत आहे. दिल्लीतील सातही जागांवर आज मतदान होत असून आम आदमी पक्षाचे संयोजक आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह मतदान केले. यानंतर पाकिस्तानमधील एका नेत्याने त्यांचा फोटो शेअर करत भारतातील निवडणुकांवर भाष्य केले होते. मात्र अरविंद केजरीवाल यांनी या पोस्टवर संताप व्यक्त करत पाकिस्तानी नेत्यालाच खडे बोल सुनावले.

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर कुटुंबासह मतदान केल्याचा फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये लिहिले, “मी आज वडील, पत्नी आणि मुलांसह मतदान केले. माझी आई आजारी असल्यामुळे ती मतदानासाठी येऊ शकली नाही. मी हुकूमशाही, बेरोजगारी आणि महागाईविरोधात मतदान केले. प्रत्येकाने मतदान केले पाहीजे.”

अरविंद केजरीवाल यांचा पोस्टला रिपोस्ट करत पाकिस्तानी नेते आणि माजी मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी लिहिले, “शांतता आणि सौहार्द हाच द्वेष आणि कट्टरतावादाचा पराभव करू शकेल. तुम्हाला आणखी शक्ती लाभो.” या मजकुरात पुढे IndiaElection2024 असा हॅशटॅग देण्यात आला आहे. पाकिस्तानी नेत्याचे कौतुक केजरीवाल यांना फारशे रुचले नाही. पाकिस्तानच्या तेहरीक-ए-इन्साफच्या फवाद हुसैन चौधरी यांच्यावर टीका केली.

अरविंद केजरीवाल म्हणाले, “चौधरी साहेब, मी आणि माझ्य देशातील जनता आमच्या समस्या सोडविण्यासाठी सक्षम आहोत. आम्हाला तुमच्या पोस्टची गरज नाही. सध्या पाकिस्तानची अवस्था अतिशय गंभीर आहे. तुम्ही आधी तुमचा देश सांभाळा. भारतातील निवडणुका हा आमचा अंतर्गत विषय आहे. दहशतवादाला सर्वाधिक प्रोत्साहन देणाऱ्यांकडून आम्हाला या विषयात ढवळाढवळ नको आहे.”

फवाद हुसैन चौधरी यांनी याआधीही भारतीय निवडणुकीवर भाष्य केलेले आहे. गुरुवारी त्यांनी राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी राहुल गांधींचे कौतुक केले होते. हुसैन यांच्या कौतुकानंतर भाजपाला आयता मुद्दा मिळाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनी पुलवामा आणि उरी हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी असल्याचा दावा केला होता. त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे कधीही कौतुक केले नाही. पण ते राहुल गांधींचे मात्र कौतुक करत आहेत.

राजनाथ सिंह यांनी एका जाहीर सभेत या विषयाचा उल्लेख केला होता. ते पुढे म्हणाले, “मला तुम्हाला (लोकांना) विचारायचे आहे की, शत्रूने कौतुक केलेल्या अशा नेत्याचा आदर करावा की, त्यांना सरकार बनवण्याची परवानगी द्यावी? यांना देशाला कोणत्या दिशेने न्यायचे आहे? यासाठी मी सर्वांना देश वाचविण्याचे आवाहन करतो.”