पीटीआय, रांची

झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांनी गुरुवारी रांची येथे एका भव्य सोहळ्यात झारखंडचे १४वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी इंडिया आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

रांचीमधील मोराबादी मैदानात झालेल्या शपथविधी सोहळ्याला हजर राहण्यापूर्वी ४९ वर्षीय हेमंत सोरेन यांनी झामुमोचे अध्यक्ष आणि त्यांचे वडील शिबू सोरेन यांची भेट घेतली. शपथविधीला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल उपस्थित होते.

हेही वाचा >>>ऑस्ट्रेलियात मुलांना समाजमाध्यमबंदी; नव्या कायद्यात नियमभंग करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या दंडाची तरतूद

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी ‘‘राज्यातील जनतेचे ऐक्य हेच आमचे सर्वात मोठे शस्त्र आहे, आमच्यात कोणी फूट पाडू शकत नाही किंवा आम्हाला गप्पही करू शकत नाही’’, असा विश्वास हेमंत सोरेन यांनी व्यक्त केला. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचे नाव न घेता, ‘‘जेव्हा जेव्हा त्यांनी आम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आमची क्रांती मोठी झाली’’, असे सोरेन यांनी ‘एक्स’वर लिहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा निवडणुकीत झामुमोच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने ८१पैकी ५६ जागांवर विजय मिळवला असून हेमंत सोरेन हे त्यांच्या बारहैत मतदारसंघातून जवळपास ४० हजार मतांनी विजयी झाले आहेत.