यजमान इंग्लंडने विश्वचषक स्पर्धेत दमदार पुनरागमन केलं आहे. बांगलादेशविरुद्ध सामन्यात इंग्लंडने ३८६ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर जेसन रॉयने १२१ चेंडूत १५३ धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकून सर्वात प्रथम गोलंदाजी करण्याचा बांगलादेशच्या कर्णधाराचा निर्णय पुरता चुकला. इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो जोडीने पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी केली. या कामगिरीसह रॉय-बेअरस्टो जोडीने १६ वर्ष जुना विक्रम आपल्या नावे जमा केला आहे.

रॉय-बेअरस्टो जोडीनं पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागीदारी करत २००३ च्या विश्वचषक स्पर्धेचा विक्रम मोडला. विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध सलामीवीरांनी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. त्यांनी मार्व्हन अटापट्टू आणि सनथ जयसूर्या यांचा १२६* धावांचा विक्रम मोडला.

याचसोबत इंग्लंडच्या संघाने वन-डे क्रिकेटमध्येही सलग सातवेळा ३०० पेक्षा जास्त धावसंख्या उभी करण्याचा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. अशी कामगिरी करणारा इंग्लंड हा एकमेव संघ आहे.

दरम्यान, बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीन आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यांना मश्रफी मोर्ताझा आणि मुस्तफिजुर रेहमानने प्रत्येकी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.