|| संतोष सावंत
त्या दिवशी अकबर बादशहा भल्या सकाळीच दरबारात दाखल झाले. ही बातमी नगरात वाऱ्यासारखी पसरली आणि सारे सरदार, उमराव आणि दरबारी मंडळी लगबगीने दरबारात हजर झाली. बादशहा बराच वेळ चिंताग्रस्त मुद्रेने सिंहासनावर बसले होते. कोणाशी काहीच बोलत नव्हते. त्यामुळे सर्व जण चिंतेत पडले होते. सर्व जण एकदा बादशहांकडे आणि एकदा परस्परांकडे असे अपेक्षेने पाहात होते. बादशहाचा राग चांगलाच परिचयाचा असल्याने कोणीही त्यांच्याशी थेट बोलण्याची किंवा प्रश्न विचारण्याची हिंमत करत नव्हते. आता सर्वानाच ती शांतता बोचू लागली होती, पण बादशहा काही सांगायलाच तयार होत नव्हते. असे वाटत होते की ते कोणाची तरी वाट पाहात आहेत.
इतक्यात बिरबल दरबारात दाखल झाला. घाईघाईने दरबारात प्रवेश करणाऱ्या बिरबलाला पाहताच बादशहांची कळी खुलली. आता त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचा मागमूसही दिसत नव्हता. बिरबल अदबीने येऊन बादशहांसमोर उभा राहिला. त्याने आदराने त्यांना कुर्निसात केला. बादशहाने त्याला मोठय़ा आपुलकीने आपल्या शेजारी बसवून घेतले. बिरबलदेखील त्यांचा आदर राखून सांभाळून शेजारी बसला. उपस्थित प्रजेने बादशहांसोबत त्याचाही जयजयकार केला. हे दृश्य पाहून बिरबलाच्या हितशत्रूंची तळपायाची आग मस्तकात गेली. बादशहा या बिरबलालाच का महत्त्व देतात? हा विचार मनात येऊन त्यांचे डोळे आग ओकू लागले. परंतु बादशहाच्या विरुद्ध बोलायचे कसे आणि कुणी? आजवर या भीतीमुळेच ही मंडळी गप्प होती. आता मात्र मत्सराने भीतीवर मात केली. त्यांनी न राहवून आपापसांत इशारे केले. बादशहाला बिरबलाविषयी वाटणारी आत्मीयता त्यांना गेली अनेक वर्षे खुपत होती. प्रजेचे मनात त्याने मिळवलेले अढळ स्थान त्यांना त्रास देत होते. त्याला कोंडीत पकडण्याची संधी ते सतत शोधत असत, परंतु बिरबलाचे चातुर्य नेहमीच त्याला संकटापासून वाचवत असे.
आज बादशहांच्या नजरेत बिरबलाला पाडायचेच असा निर्धार करून एक तरुण मंत्री बोलायला उभा राहिला. म्हणाला, ‘‘बादशहा अकबर, गुस्ताखी माफ. आपले अभय लाभले तर मला काही बोलायचे आहे!’’ बादशहांनी हातानेच संमती दिली आणि तो पुढे बोलू लागला. ‘‘आपल्या दरबारात एकापेक्षा एक मौल्यवान रत्ने आहेत. या गुणीजनांची कीर्ती केवळ आपल्याच राज्यात नव्हे तर, संपूर्ण जगात पसरलेली आहे. परंतु खाविंद, आपली मर्जी मात्र सर्वावर सारखी नाही. तुम्ही बिरबलालाच जास्त महत्त्व देता. आता वयोमानानुसार त्याची बुद्धी थकली आहे. परंतु आपण मात्र आजही त्याच्यावर तेवढाच विश्वास दाखवता. आपली ही प्रजाही त्याचाच जयजयकार करते. असे का? आज आपली समस्या सोडवण्याची संधी आम्हालाच मिळायला हवी.’’
त्याचे बोलणे संपले, तेव्हा बादशहा रागाने लाल झाले होते. परंतु गालातल्या गालात स्मितहास्य करणाऱ्या बिरबलाकडे लक्ष जाताच ते शांत झाले. बादशहा अकबर बोलू लागले, ‘‘तुम्हाला असे वाटत असेल तर मग ठीक आहे. मी ही संधी तुम्हाला देतो. काल रात्री उशिरा माझ्या महालात शेजारच्या राज्याचे महाराज पाहुणे म्हणून आले आहेत. त्यांनी आपल्या समोर एक कोडे सोडवण्याचे आव्हान ठेवले आहे. आपण जर हे कोडे सोडवू शकलो नाही तर आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा पराभव जाहीररीत्या मान्य करावा लागेल. महाराजांकडे एकूण १७ जातिवंत अश्व आहेत. त्यांना यापैकी अर्धे मोठय़ा राजकुमाराला, एक सष्टमांश मधल्याला आणि एक नवमांश लहान राजकुमाराला भेट द्यायचे आहेत. कोणत्याही अश्वाला इजा न पोहोचवता हे कार्य सिद्धीस जायला हवे.’’
सगळ्यांनी खूप विचारमंथन केले. तर्कवितर्क लढवले, गृहीतके मांडली. पण उपयोग शून्य. दरबारात एकापेक्षा एक विद्वान आणि महापराक्रमी योद्धे असूनही बादशहाच्या या कोडय़ाचे उत्तर मात्र कोणालाच देता येत नव्हते. तरीही ती मंडळी हार मानायला तयार नव्हती. हे कोडेच चुकीचे आहे, असे ती ठामपणे सांगू लागली. हिंमत असेल तर बिरबलाने हे कोडे सोडवून दाखवावे, असे जाहीर आव्हानच त्यांनी दिले. बादशहाने यावर काहीही न बोलता बिरबलाकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावरील हास्य अजूनही अबाधित होते.
बिरबलाने बादशहांना सांगितले की, ‘‘आपण त्या महाराजांना बोलावून घ्या. आपले उत्तर तयार आहे!’’ त्याप्रमाणे काही काळातच ते महाराज आपल्या १७ जातिवंत अश्वांसोबत दरबारात दाखल झाले. बिरबलाने स्वत:चा एक अश्व त्यात उभा केला. आता एकूण १८ अश्व झाले. मोठय़ाला नऊ, मधल्याला सहा आणि धाकटय़ाला दोन अश्व देऊन उरलेला आपला अश्व बिरबलाने परत घेतला. उपस्थित सर्वच थक्क झाले. सर्वानी बिरबलाच्या चातुर्याचे मनापासून कौतुक केले.
‘‘व्यक्तीचे वय वाढते. काही वेळा हालचालीही मंदावतात, परंतु तिचा अनुभव आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता नेहमीच अजोड ठरते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या व्यक्तीची निष्ठा. म्हणूनच या गुणांच्या बळावर ती व्यक्ती नेहमीच महत्त्वाची ठरते,’’ अशा शब्दांत बादशहांनी बिरबलाचे नाव न घेता सर्वाची योग्य कानउघडणी केली.