अमेरिकेच्या दबावाला न जुमानता रशियाकडून अनुदानित तेल खरेदी केल्याबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. भारत सरकार स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीने हे साध्य करण्यासाठी काम करत आहे, असे इम्रान खान म्हणाले. त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) नेतृत्वाखालील सरकारची डोके नसलेल्या कोंबड्यासारखी अर्थव्यवस्था अशी टीका केली. मोदी सरकारने काल केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याच्या घोषणेचे त्यांनी कौतुक केले.

इंधन दरात कपात करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाची माहिती शेअर करताना, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) नेते इम्रान खान यांनी ट्विटरवर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “क्वाडचा एक भाग असूनही, भारताने स्वतःला अमेरिकेच्या दबावापासून अलिप्त ठेवले आणि जनतेला दिलासा देण्यासाठी अनुदानित रशियन तेल खरेदी केले. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीने आमचे सरकार जे साध्य करण्यासाठी काम करत होते ते भारताने केले,” असे इम्रान खान म्हणाले.

केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलच्या दरात ७ रुपयांनी कपात करण्यात आली.

युक्रेनवर आक्रमण केल्यापासून पाश्चात्य देशांनी मॉस्कोवर कठोर निर्बंध लादले असून, अनेक तेल आयातदारांना रशियासोबत व्यवसाय करणे बंद करण्यास भाग पाडले आहे, अशा वेळी भारताची रशियन तेलाची आयात वाढली आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, भारताने महागाईशी लढा देण्यासाठी रशियाकडून अनुदानित तेलाची खरेदी वाढवली आणि एप्रिलमध्ये देशातील कच्च्या तेलाची आयात साडेतीन वर्षांच्या उच्चांकावर नेली.

इम्रान खान म्हणाले की त्यांच्या सरकारला लोकांना दिलासा देण्यासाठी अशीच कारवाई करायची होती, परंतु “मीर जाफर आणि मीर सादिक सत्ता परिवर्तनासाठी बाहेरील दबावाला बळी पडले, असे इम्रान खान म्हणाले. माजी आमच्या सरकारसाठी पाकिस्तानचे हित सर्वोच्च होते, परंतु दुर्दैवाने स्थानिक एमआय जाफर आणि मीर सादिक यांनी सत्तापरिवर्तनासाठी बाह्य दबावाला बळी पडले. आता डोके नसलेल्या कोंबड्यासारखे अर्थव्यवस्थेसोबत देश चालवत आहे,” असे इम्रान खान म्हणाले.