पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेम्स बॉण्ड असल्याचं तृणमूल काँग्रेसने म्हटलं आहे. भाजपाच्या मुख्य विरोधी पक्षांपैकी एक असणाऱ्या तृणमूलने मोदींना अचानक जेम्स बॉण्ड का म्हटलं आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर तृणमूलने हॉलिवूडमधील या गुप्तहेराची उपमा मोदींना देण्यामागे कारण आहे या पात्राची ओळख असणारा क्रमांक म्हणजे, ००७.

तृणमूलचे वरिष्ठ नेते देरेक ओब्रायन यांनी फेसबुकवर पंतप्रधान मोदींसंदर्भातील एक फोटो पोस्ट केलाय. यामध्ये पंतप्रधान मोदी सूटाबुटात दाखवण्यात आले असून ते बॉण्डच्या पोजमध्ये आहेत. या फोटोवर ‘ते मला ००७’ म्हणतात असं लिहिण्यात आलं आहे. खाली या ००७ चं स्पष्टीकरण देताना, ‘शून्य विकास, शून्य आर्थिक विकास आणि आर्थिक नियोजनामधील गोंधळाची सात वर्षे’ असंही फोटोवर लिहिलेलं आहे.

चित्रपटांमध्ये जेम्ब बॉण्डला हा क्रमांक देण्याचं एक खास कारण आहे. कारण बॉण्ड हा ‘००’ एजंट आहे. म्हणजेच त्याला आपल्या मोहिमेदरम्यान शत्रूला ठार करण्याची परवानगी आहे. तर अशाप्रकारची खास परवानगी मिळालेला तो सातवा एजंट असल्याने त्याला ‘००७’ क्रमांकाने ओळखलं जातं. मात्र याच क्रमांकाचा वेगळा अर्थ लावत तृणमूलने मोदींना ‘००७’ म्हटलं आहे. याच वर्षी पंतप्रधान मोदींनी सत्तेत सात वर्षे पूर्ण केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोदींवर टीका करणाऱ्या या पोस्टमध्ये तृणमूलमध्ये आर्थिक विकाससंदर्भातील उल्लेख केला असला तरी घटनांचा उल्लेख केलेला नाही. मात्र तृणमूलने नोटबंदी, जीएसटीसारख्या मुद्द्यांवरुन यापूर्वी सरकारवर टीका केलीय. तर सध्या इंधनाचे दर ही सर्वात मोठी समस्या चर्चेत आहे.