दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीशांचे श्वान घरातून चोरी केल्याच्या आरोपाखाली चक्क २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे श्वान शेजारील कुटुंबियांनी चोरल्याचा आरोप न्यायाधीशांच्या कुटुंबियांनी केला आहे. उत्तर प्रदेशच्या बरेली येथील सनसिटी कॉलनी येथे ही घटना घडली.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित न्यायाधीश हे उत्तर प्रदेशच्या हरदोई येथे कार्यरत आहेत. तर त्यांचे कुटुंब बरेली येथील सनसिटी कॉलनीत वास्तव्यास आहेत. न्यायाधीशांच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अहमद नावाच्या व्यक्तीचा न्यायाधीशांच्या कुटुंबियांशी वाद झाला झाला होता. त्यावेळी अहमदने त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा – मराठी माणसानं पाकिस्तानात जपली मुंबईची ओळख; VIDEO मधील शब्द अन् शब्द ऐकून व्हाल खूश

याशिवाय १६ मे रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान अहमदच्या पत्नीने न्यायाधीशांच्या घरी जाऊन वाद घातला होता. न्यायाधीशांच्या घरातील श्वानाने तिच्या मुलीवर हल्ला केला, असा आरोप तिने केला होता. बराच वेळ हा वाद सुरू असल्याने न्यायाधीशांच्या कुटुंबियांनी या संपूर्ण घटनेची माहिती न्यायाधीशांना दिली. त्यांनी लखनौ येथून बरेली पोलिसांना फोन करून अहमदच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल करण्यास सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिता चौहान यांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही कुटुंबियांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, आता न्यायाधीशांच्या कुटुंबियांनी त्यांच्या घरातून श्वान चोरीला गेल्याची तक्रार केली आहे. तसेच त्यांनी शेजारी राहणाऱ्या अहमदच्या कुटुंबियांवर श्वान चोरल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर बरेली पोलिसांनी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असून न्यायाधीशांच्या श्वानाचा शोध घेतला जात असल्याची माहिती आहे. याप्रकरणी माध्यमांशी न्यायाधीशांच्या कुटुंबियांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.