Indian journalist confront Pakistan PM Shehbaz Sharif watch Viral video : संयुक्त राष्ट्राच्या ८० व्या महासभेत बोलत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताबद्दल बेताल विधाने केली. मात्र संयुक्त राष्ट्र मुख्यालयात प्रवेश करण्याच्या आधी त्यांना एका भारतीय पत्रकाराने जाब विचारल्याचे पाहायला मिळाले.
जेव्हा शरीफ हे सभागृहात प्रवेश करत होते तेव्हा एएनआय या वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने त्यांना थेट प्रश्न विचारला की, पाकिस्तान सीमापार दहशतवाद कधी थांबवणार? यावर शरीफ यांनी उत्तर देखील दिले. या संवादाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
“पंतप्रधान शरीफ, तुम्ही सीमेपलीकडून होणारा दहशतवाद कधी थांबवणार आहात? पाकिस्तानचे पंतप्रधान तुम्ही सीमेपलीकडून होणारा दहशतवाद कधी थांबवणार आहात?” असा प्रश्न महिला पत्रकाराने विचारत असल्याचे या व्हायरल व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
शरीफ हे पहिल्यांदा प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसून आले, त्यानंतर प्रवेश द्वारातून आत गेल्यानंतर ते मागे वळले आणि त्यांनी प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. शहबाज शरीफ यांनी उत्तर दिले की, “आम्ही सीमेपलीकडील दहशतवादाचा पराभव करत आहोत. आम्ही त्यांना हरवत आहोत.” त्यानंतर पत्रकार आयुषी अग्रवाल यानी यावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावलं, त्या मोठ्याने म्हणाल्या की, “पाकिस्तानचे पंतप्रधान, भारत तुमचा पराभव करत आहे”
काय म्हणाले शाहबाज शरीफ?
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत बोलत असताना शाहबाज शरीफ म्हणाले, “जर ट्रम्प यांनी वेळेवर आणि निर्णायकपणे हस्तक्षेप केला नसता तर या संघर्षाचे विनाशकारी परिणाम झाले असते.” पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी ट्रम्प यांना शांती पुरूष असे म्हटले. तसेच पाकिस्तान आणि भारत यांच्यातील शस्त्रविराम हा ट्रम्प यांच्या हस्तक्षेपामुळेच शक्य झाला, असेही ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ट्रम्प यांच्या स्तुतीसुमने उधळत असताना शाहबाज शरीफ यांनी भारताच्या हवाई दलाचे नुकसान केल्याचाही बिनबुडाचा दावा केला. आमच्या हवाई दलाने भारताला जोरदार प्रत्युत्तर देत, भारताची ७ लढाऊ विमाने पाडली, असा दावा शाहबाज शरीफ यांनी केला. शाहबाज शरीफ यांनी म्हटले की, “या वर्षी मे महिन्यात माझ्या देशाला पूर्वेकडून विनाकारण आक्रमणाचा सामना करावा लागला. याला आमचा प्रतिसाद स्वसंरक्षणाच्या अनुषंगाने होता. आम्ही त्यांना अपमानास्पदरीत्या माघारी पाठवले.”
शाहबाज शरीफ यांच्या बिनबुडाच्या दाव्याला भारताने शनिवारी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी शाहबाज शरीफ यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. त्यांनी शरीफ यांच्या भाषणाला हास्यास्पद नाटक म्हणत पाकिस्तान दहशतवादाचे उदात्तीकरण करत असल्याचा आरोप केला. तसेच पाकिस्तान वारंवार दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचे सत्य जगासमोर आलेले आहे, असेही पेटल गहलोत यांनी म्हटले.