भारतात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख १४ हजार ८३५ करोना रुग्ण आढळले आहेत. तर २१०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोणत्याही देशात एका दिवसात एवढी रुग्णसंख्या नोंद झालेली नाही. भारताच्या आधी अमेरिकेत एका दिवसात तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. २ जानेवारी २०२१ ला अमेरिकेत ३ लाख ३१० रुग्ण आढळले होते.

Maharashtra Corona : चिंताजनक! २४ तासांत राज्यात ५६८ करोना रुग्णांचा मृत्यू; ६७,४६८ नवे करोनाबाधित!

भारतात सध्या रुग्णसंख्या १ कोटी ५९ लाख ३० हजार ९६५ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत १ कोटी ३४ लाख ५४ हजार ८८० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत झालेल्या २१०४ मृत्यूनंतर एकूण मृतांची संख्या १ लाख ८४ हजार ६५७ वर पोहोचली आहे. देशात सध्याच्या घडीला २२ लाख ९१ हजार ४२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत देशभरात १३ कोटी २३ लाख ३० हजार ६४४ जणांचं लसीकरण झालं आहे.

देशातील रुग्णसंख्येत सर्वाधित वाटा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्रात बुधवारी तब्बल ६७ हजार ४६८ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासांत देशात नोंद झालेल्या रुग्णसंख्येपैकी २२ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. यानंतर उत्तर प्रदेश (३३,२१४) आणि दिल्लीचा (२४,६३८) क्रमांक आहे. याशिवाय महाराष्ट्रात सर्वाधिक ५६८ रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील मृत्यूदर १.५४ टक्के इतका नोंद झाल्याचं आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.