देशात सलग दुसऱ्या दिवशी २४ तासात दोन हजारापेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी देशात २ हजार ३८० नवे रुग्ण आढळले असून १ हजार २३१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला १३ हजार ४३३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याआधी बुधवारी देशात २ हजार ६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी १ हजार २४७ रुग्ण आढळले असताना बुधवारी झालेली ही वाढ मोठी होती.

सरकारी डेटानुसार, गुरुवारी सकाळी पॉझिटिव्हिटी रेट ०.५३ टक्के आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट ०.४३ टक्क्यांवर आहे. गेल्या २४ तासात देशात जवळपास ४ लाख ५० हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात सध्याच्या घडीला १८७ कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस देण्यात आले आहेत.

बुधवारी केंद्राने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, मिझोरम या पाच राज्यांना पत्र लिहून राज्यातील स्थितीवर लक्ष ठेवण्यास तसंच नियमांचं पालन करण्यास सांगितलं. केंद्राने राज्यांना करोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासोबत परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य ती पावलं उचलण्यास सांगितलं आहे.

दिल्लीतील स्थिती

राजधानी दिल्लीत करोना रुग्णसंख्येत मोठी वाढ पहायला मिळत आहे. दिल्लीमध्ये बुधवारी एक हजारापेक्षा जास्त करोना रुग्ण आढळले. यासोबत शहरात १० फेब्रुवारीनंतची सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उत्तर प्रदेशात मास्क अनिवार्य

शेजारी राज्यं आणि जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही शिफारशी केल्या असून अधिकाऱ्यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा आदेश दिला आहे. लखनऊ आणि एनसीआरमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य करण्यात आला आहे.