पीटीआय, नवी दिल्ली

“भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावरील चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात पुढे जात आहे,” असे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी सांगितले. त्याचवेळी देशातील शेतकरी, मच्छिमार आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे (एमएसएमई) हितसंबंधांचे सरकार संरक्षण करेल असे आश्वासन त्यांनी पुन्हा एकदा दिले.

भारत आणि अमेरिकेचा द्विपक्षीय व्यापार करार ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या करारावर फेब्रुवारीपासून वाटाघाटी सुरू असून आतापर्यंत चर्चेच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यापैकी अखेरची तीनदिवसीय फेरी शुक्रवारी संपली असून, वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ त्यामध्ये सहभागी झाले होते. अमेरिकेला कृषी व्यापारात काही सवलती हव्या असून त्याला भारताकडून विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पीयूष गोयल यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.

भारताच्या शेतकऱ्यांचे, मच्छिमारांचे, भारताच्या ‘एमएसएमई’ क्षेत्राचे, जोपर्यंत देशाच्या हितसंबंधांचे पूर्णपणे संरक्षण केले जाणार नाही, तोपर्यंत कोणताही करार केला जाणार नाही. – पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री

वाणिज्यमंत्री महिनाअखेरीस ब्रसेल्स दौऱ्यावर

भारत आणि युरोपीय महासंघादरम्यान (ईयू) मुक्त व्यापार करार करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू असून पीयूष गोयल या महिन्याअखेरीस बेल्जियमची राजधानी ब्रसेल्सला जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ब्रसेल्स येथे ‘ईयू’चे मुख्यालय आहे. जर्मनीची राजधानी असलेल्या बर्लिन येथे २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान आयोजित ‘बर्लिन ग्लोबल डायलॉग’मध्ये गोयल सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते ब्रसेल्स येथे ईयूचे व्यापार कमिशनर मारोस सेफकोविच यांच्याशी चर्चा करणार आहेत.