व्हिएतनामला ब्राह्मोस क्षेपणास्त्र विकण्याचा करार झाल्याचे वृत्त भारत सरकारने फेटाळले आहे. सरकारकडून शुक्रवारी याबाबत खुलासा करण्यात आला. व्हिएतनामबरोबर सुरक्षा क्षेत्रातील आमची भागीदारी सातत्याने वाढत आहे. परंतु, क्षेपणास्त्र विक्रीवरून करार झाल्याचे वृत्त निराधार असल्याचे सरकारने म्हटले आहे. विदेश मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी याप्रकरणी माध्यमांसमोर सरकारची बाजू मांडली. व्हिएतनामच्या विदेश मंत्रालयाने स्वत: हे वृत्त निराधार असल्याचे म्हटल्याचे रवीश कुमार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे वृत्त निराधार आहे. ज्या व्यक्तीच्या हवाल्याने हे वृत्त दिले, त्या व्यक्ती समोर येत अशा प्रकारचा कोणताच करार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे. हे सर्व वृत्त खोटे आहे, असे रवीश कुमार यांनी म्हटले. व्हिएतनामच्या विदेश मंत्रालयाने अद्याप सार्वजनिकरित्या या वृत्ताचे खंडन केलेले नाही.

भारताबरोबर आमचे आर्थिक, व्यापार विषयक, संस्कृती, शिक्षण, सुरक्षा आणि इतर क्षेत्रातील संबंधात वेगाने वाढ होत असल्याचे व्हिएतनामच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या वृत्ताबाबत बोलताना म्हटले. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार व्हिएतनाम आणि भारतादरम्यानच्या या करारामुळे चीनचा जळफळाट होऊ शकतो. ब्राह्मोस क्षेपणास्त्र जगातील सर्वात आधुनिक क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. चीन आणि व्हिएतनाममध्ये गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. त्यातच हे वृत्त आल्याने चीन आणखी आक्रमक झाला असता.

दरम्यान, शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना एका प्रश्नाला उत्तर देताना व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ले थी गुरु हांग यांनी व्हिएतनामकडून खरेदी करण्यात आलेली सुरक्षा उपकरणे देशाच्या संरक्षणासाठी असल्याचे म्हटले होते. ‘भारत आणि व्हिएतनाम सामरिक रणनितीवर काम करत असून शांतता, स्थिरता, विकासासाठी दोन्ही देश एकमेकांना सहकार्य आहेत,’ असे त्यांनी म्हटले होते. दोन्ही देश संरक्षण क्षेत्रातही एकमेकांसोबत काम करत असल्याचेही ते म्हणाले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian government says report of brahmos sale to vietnam incorrect
First published on: 19-08-2017 at 11:23 IST