Randhir Jaiswal On Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांची जगात चर्चा सुरू आहे. या टॅरिफचे परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहेत. यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी ३० जुलै रोजी भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू करणार असल्याची घोषणा केली. तसेच रशियाबरोबर भारताने व्यवसाय केल्यामुळे दंडही वसूल करणार असल्याचं सांगितलं. तसेच ट्रम्प यांनी रशिया आणि भारताच्या अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था असंही म्हटलं. दरम्यान, ट्रम्प यांच्या त्या विधानाला आता भारताने सडेतोड उत्तर दिलं आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारत-रशियाच्या संबंधाबाबत सविस्तर भाष्य करत दोन्ही देशांत कोणत्याही प्रकारचा तणाव येणार नसल्याचं सांगितलं. रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं की, “विविध देशांसोबरोबरचे आमचे द्विपक्षीय संबंध त्यांच्या स्वतःच्या गुणवत्तेवर आधारित आहेत. त्या संबंधांना कोणत्याही तिसऱ्या देशाच्या नजरेतून पाहिलं जाऊ नये. भारत आणि रशिया हे स्थिर भागीदार आहेत, तसेच दोन्ही देश वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे राहिले आहेत”, असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.

रणधीर जयस्वाल पुढे म्हणाले की, “आमच्या संरक्षण गरजांची पूर्तता आणि स्रोत केवळ आमच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि धोरणात्मक मूल्यांकनांद्वारे निश्चित केली जाते. तसेच आम्ही अमेरिकेबरोबर ठोस अजेंड्यावर पुढे जाण्यास वचनबद्ध आहोत. त्यामुळे आम्हालाही विश्वास आहे की अमेरिकेबरोबरचे आमचे संबंध पुढे जातील”, असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय विधान केलं होतं?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच भारत आणि रशियाला ‘मृत अर्थव्यवस्था’ असे संबोधून मोठा वाद निर्माण केला होता. रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के कर आणि दंडाची घोषणा केली. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाला रशियाने प्रत्युत्तर दिलं होतं. रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना प्रत्युत्तर देताना म्हटले की, ट्रम्प यांनी ज्यांना ते “मृत” म्हणतात, त्यांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष करू नये. मृत अर्थव्यवस्थेवरील ट्रम्प यांच्या टिप्पणीला त्याच भाषेत उत्तर देताना, रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष मेदवेदेव यांनी ट्रम्प यांना रशियाच्या अणु क्षमतेची आठवण करून दिली.

अमेरिकेकडून भारतावर २५ टक्के टॅरिफ लागू

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यानी ३० जुलै मोठी घोषणा केली. त्यांनी म्हटलं आहे की येत्या १ ऑगस्ट २०२५ पासून भारताला २५ टक्के टॅरिफ (आयात शुल्क) भरावं लागेल. ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांनी एक पोस्ट करून यासंबधीची माहिती दिली होती. ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की भारत व अमेरिका मित्र राष्ट्रे असूनही गेल्या काही वर्षांमध्ये उभय देशांमध्ये फारसे व्यावसायिक व्यवहार झालेले नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.