WHO च्या परीक्षेत भारतीय RTPCR Test ९५ टक्क्यांनी पास! ICMR नं केले निकाल जाहीर!

WHO च्या प्रोफिशियन्सी टेस्टिंग पॅनलमध्ये भारतातील ७३९ आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळा पास झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

rtpcr tests in india

करोनाच्या चाचण्यांसंदर्भात जगभरात वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. काही ठिकाणी RTPCR चाचण्या केल्या जातात, काही ठिकाणी अँटिजेन टेस्ट केल्या जातात. नुकतीच भारत सरकारने मायलॅबच्या सेल्फ टेस्टिंग किटला देखील मान्यता दिली आहे. मात्र, अनेकदा आधी पॉझिटिव्ह आलेली करोना चाचणी काही वेळात पुन्हा केल्यास निगेटिव्ह आल्याच्या देखील तक्रारी ऐकायला मिळाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ICMR आणि WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या दर्जा तपासणी उपक्रमांतर्गत करण्यात आलेल्या चाचणीमध्ये भारतात होत असलेल्या आरटीपीसीआर टेस्ट उत्तीर्ण झाल्या असल्याचं निदर्शनास आलं आहे. या चाचणीमध्ये सहभागी झालेल्या प्रयोगशाळांपैकी ९५ टक्के प्रयोगशाळांमध्ये तपासण्यात आलेल्या नमुन्यांचे अचूक अहवाल देण्यात आले आहेत.

७७९ प्रयोगशाळांची चाचणी!

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसार Indian Council of Medical Research तर्फे यासंदर्भातली घोषणा करण्यात आली आहे. WHO External Quality Assurance Program कडून भारतातील प्रयोगशाळांची कार्यक्षमता तपासण्यासाठी विशिष्ट प्रोफिशियन्सी टेस्टिंग पॅनल आयसीएमआरला देण्यात आले होते. या तपासण्यांमध्ये भारतीय प्रयोगशाळांपैकी ७७९ प्रयोगशाळांमधील आरटीपीसीआर चाचणी पद्धतीचा समावेश करण्यात आला होता. यापैकी ७३९ अर्थात ९५ टक्के प्रयोगशाळांनी केलेल्या आरटीपीसीआर चाचण्यांचे अचूक निकाल आल्याचं स्पष्ट झालं आहे. या ७७९ प्रयोगशाळांमध्ये ४१० सरकारी तर ३६९ प्रयोगशाळा खासगी होत्या.

भारतात आजघडीला एकूण २५५३ प्रयोगशाळांमध्ये कोविड १९ च्या चाचण्या केल्या जातात. त्यापैकी १४९९ प्रयोगशाळा आरटीपीसीआर, ९१५ प्रयोगशाळा ट्रूनेट तर १३९ प्रयोगशाळा सीबीएनएएटी असल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

 

भारतात आता सेल्फ टेस्ट किटला मान्यता!

दरम्यान, चाचण्यांची क्षमता वाढवण्यासाठी आणि करोनाचं निदान अधिक वेगाने होण्यासाठी आयसीएमआरनं नुकतीच एका स्वदेशी सेल्फ टेस्टिंग किटला मान्यता दिली आहे. भारतातील स्वदेशी बनावटीचं आरटीपीसीआर टेस्टिंग किट बनवणाऱ्या पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सनं ‘कोव्हिसेल्फ’ या सेल्फ टेस्टिंग किटचीही निर्मिती केली आहे. त्यामुळे आता घरच्या घरी स्वत:ची चाचणी करणं शक्य होणार असून त्यातून करोनाचं त्वरीत निदान होणंही शक्य होणार आहे.

वाचा सविस्तर – जाणून घ्याः घरच्या घरी करोनाची चाचणी कशी कराल?

अल्प किमतीत…!

डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायही स्थानिक औषध दुकानातून तसेच ऑनलाइन पद्धतीने हे टेस्टिंग किट खरेदी करणे शक्य आहे. भारतात या किटची किंमत २५० रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. लवकरात लवकर हे किट विक्रीसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्सचे सुजित जैन यांनी दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian rtpcr test laboratories achieved passing scores in the proficiency testing panel by who pmw

ताज्या बातम्या