Petal Gahlot On Shehbaz Sharif in UNGA : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत बोलताना मोठे दावे केले होते. मे महिन्यांत भारताबरोबर झालेल्या लष्करी संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाने भारताची ७ भारतीय विमाने पाडल्याचा दावा शाहबाज शरीफ यांनी केला होता. तसेच सिंधू पाणी करार स्थगितीचा मुद्दा उपस्थित करत सिंधू पाणी करार स्थगित करण्याची भारताची कृती बेकायदेशीर असल्याचं शरीफ यांनी म्हटलं होतं.

शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्यानंतर भारताने शनिवारी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव पेटल गहलोत यांनी शाहबाज शरीफ यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. पेटल गहलोत यांनी शरीफ यांच्या भाषणाला हास्यास्पद नाटक म्हणत पाकिस्तान दहशतवादाचं उदात्तीकरण करत असल्याचा आरोप केला. तसेच पाकिस्तान वारंवार दहशतवादाला प्रोत्साहन देत असल्याचं सत्य जगासमोर आलेलं आहे, असंही पेटल गहलोत यांनी म्हटलं. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

संयुक्त राष्ट्रांत भारताच्यावतीने पेटल गेहलोत यांनी उत्तराचा अधिकार वापरून पाकिस्तानला उत्तर दिलं. गेहलोत म्हणाल्या की, “आज सकाळी या व्यासपीठावर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एक हास्यास्पद नाटक सादर केलं आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या परराष्ट्र धोरणाचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या परराष्ट्र धोरणाचा केंद्रबिंदू असलेल्या दहशतवादाचा गौरव केला. मात्र, कितीही नाटकं आणि कितीही खोटं बोललं तरी सत्य लपवता येत नाही”, असं पेटल गहलोत यांनी म्हटलं.

‘दहशतवादाला आश्रय देण्याचा पाकिस्तानचा इतिहास’

पेटल गहलोत यांनी संयुक्त राष्ट्रांला आठवण करून दिली की पाकिस्तानचा दहशतवादाला आश्रय देण्याचा दीर्घ इतिहास आहे. त्या म्हणाल्या की, “पाकिस्तानने ओसामा बिन लादेनला एक दशक आपल्या देशात लपवून ठेवलं होतं, आणि जगाला दाखवण्यासाठी ते दहशतवादाविरुद्ध लढण्याचं नाटक करत राहिले. आता अलिकडेच एका पाकिस्तानी मंत्र्यांनी उघडपणे कबूल केलं की त्यांच्या देशात दहशतवादी छावण्या अनेक दशकांपासून कार्यरत आहेत. २५ एप्रिल २०२५ रोजी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानने रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या दहशतवादी संघटनेला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानचा पाठिंबा असलेली ही संघटना जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांच्या हत्येसाठी जबाबदार आहे”, असंही पेटल गहलोत यांनी म्हटलं.

“भारताची ७ विमाने पाडली”, पाकिस्तानी पंतप्रधानांचा दावा

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत असा दावा केला की, मे महिन्यात भारतासोबत झालेल्या लष्करी संघर्षात पाकिस्तानी हवाई दलाने भारताची ७ भारतीय विमाने पाडली. शाहबाज शरीफ यांनी म्हटलं की, “या वर्षी मे महिन्यात माझ्या देशाला पूर्वेकडून विनाकारण आक्रमणाचा सामना करावा लागला. याला आमचा प्रतिसाद स्वसंरक्षणाच्या अनुषंगाने होता. आम्ही त्यांना अपमानास्पदरीत्या माघारी पाठवलं”, असं शाहबाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या ८० व्या महासभेत बोलताना म्हटलं होतं.