भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेलेले असतानाच मंगळवारी भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना पाचारण करून पाकिस्तान सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला खतपाणी घालत असल्याबद्दल कडक शब्दांत चांगलीच समज दिली.
परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी बासित यांना आपल्या कार्यालयात पाचारण केले आणि पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याबद्दल कडक शब्दात निषेध नोंदविला. जयशंकर यांनी या वेळी लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि पाकिस्तानचा नागरिक बहादूर अली याचा विशेष उल्लेख केला. काश्मीरमध्ये एका चकमकीच्या वेळी बहादूर अली याला पकडण्यात आले होते.
बहादूर अली याचा जन्म झिया बग्गा या पाकिस्तानातील गावांत झाला असून त्याला २५ जुलै रोजी भारतीय अधिकाऱ्यांनी पकडले तेव्हा त्याच्याकडून एके-४७, जिवंत काडतुसे, बॉम्ब आदी शस्त्रे आणि स्फोटके हस्तगत करण्यात आली होती. लष्कर-ए-तोयबाच्या छावण्यांमध्ये प्रशिक्षण घेतल्याची आणि त्यानंतर भारतात घुसखोरी करून लष्कराच्या नियंत्रण कक्षाशी सतत सपर्क ठेवून भारतीय सुरक्षा रक्षकांवर हल्ले करण्याबाबतचे आदेश आपल्याला देण्यात येत होते अशी कबुली बहादूर अलीने भारतीय अधिकाऱ्यांकडे दिल्याचे या वेळी बासित यांना सांगण्यात आले.
हिजबूलचा दहशतवादी वानी याला कंठस्नान घालण्यात आल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी वानी याला हुतात्मा संबोधले आणि एक दिवस काश्मीर हा पाकिस्तानचा भाग झालेला असेल असे प्रक्षोभक वक्तव्यही केले त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांत अधिकच कटुता आली आहे. त्या पाश्र्वभूमीवर बासित यांना पाचारण करून त्यांना समज देण्यात आली आहे.