Iran Strikes 150 Missiles on Israel : इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर हवाई हल्ला केल्यानंतर रात्री इराणनेही इस्रायलला चोख प्रत्युत्तर दिलं. इराणने इस्रायलमधील अनेक शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रे डाकली. यामध्ये प्रामुख्याने तेल अवीव व जेरुसलेम या दोन मोठ्या शहरांना लक्ष्य केलं आहे. इराणी लष्कराने इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचं वृत्त एएनआयने दी टाइम्स ऑफ इस्रायलच्या हवाल्याने प्रसिद्ध केलं आहे.
इस्रायलमध्ये शुक्रवारी मध्यरात्री अचानक सायरन वाजू लागले. तेल अवीव शहरातील नागरिकांनी आकाशात अनेक क्षेपणास्त्रे पाहिली. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. इराणी लष्कराने रात्री दोन वेळा इस्रायलवर बॉम्बवर्षाव केला. इस्रायली लष्कराशी संबंधित नऊ ठिकाणं प्रभावित झाल्याचं टाइम्स ऑफ इस्रायलने म्हटलं आहे. यामध्ये आतापर्यंत १५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, यापैकी काहीजण किरकोळ जखमी असल्याचं सांगितलं जात आहे.
इस्रायला अमेरिकेची मदत
इस्रायली लष्कराने या हल्ल्याची माहिती देताना सांगितलं की इराणने आमच्यावर १०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यापैकी बहुसंख्य क्षेपणास्त्रे आम्ही अडवली आहेत. आमच्या प्रत्युत्तरामुळे अनेक क्षेपणास्त्रे केवळ सीमेजवळ पडली. दरम्यान, दोन अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की अमेरिकन लष्कराने इस्रायलच्या दिशेने जाणारी अनेक क्षेपणास्त्रे पाडण्यात इस्रायली लष्कराची मदत केली आहे.
तेल अवीवमध्ये मोठी वित्तहानी
इस्रायलमधील वृत्तवाहिनी चॅनेल १२ ने म्हटलं आहे की इराणी लष्करी हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तर आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ३४ जणांना छर्रे लागून किरकोळ जखमा झाल्या आहेत. मोठी जीवितहानी झाली नसली तरी या हल्ल्यात इस्रायलमध्ये मोठी वित्तहानी झाली आहे. तेल अवीवमधील रमत गान येथील एक रहिवासी इमारत, एका अपार्टमेंटसह अनेक अस्थापनांचं नुकसान झालं आहे. तर मध्य तेल अवीवमध्ये काही इमारतीं क्षतीग्रस्त झाल्या आहे.
दरम्यान, या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे इस्रायलकडे असलेली आयर्न डोम यंत्रणा अपयशी ठरली आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कुठल्याही प्रकारच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी इस्त्रायलने ही यंत्रणा विकसित केल्याचा अनेकदा दावा करण्यात आला आहे.
खोमेनींचा इस्रायलला इशारा
या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी एक्सवर एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की झायोनिस्ट राजवटीने मोठी चूक केली आहे. मात्र, ईश्वराच्या कृपेने आता त्यांची राजवट उध्वस्त होईल. इराणी राष्ट्र आपल्या शहिदांचं रक्त वाया जाऊ देणार नाही. तसेच इराणच्या हवाई क्षेत्राच्या उल्लंघनाकडेही दुर्लक्ष करणार नाही. आमचे सशस्त्र दल सुसज्ज आहे आणि आमची जनता सशस्त्र दलांच्या पाठिशी आहे.