Israel Iran War Tension : इस्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यामुळे मध्य-पूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील इराणच्या अनेक लष्करी तळांना व इराणमधील आण्विक तळांना लक्ष्य केलं. पाठोपाठ इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ सुरू केल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, आत इस्रायली हल्ल्यात इराणमध्ये झालेल्या नुकसानाची माहिती समोर येत आहे. इस्रायली हल्ल्यात इराणच्या लष्करातील अनेक मोठे अधिकारी व अणूशास्त्रज्ञ ठार झाल्याचं वृत्त नुकतंच समोर आलं आहे.
इराणी माध्यमे व प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे की नातान्झ प्रांतातील इराणच्या प्राथमिक युरेनियम शुद्धीकरण प्रकल्पात मोठा स्फोट झाला आहे. यावर इराणकडूनही प्रत्युत्तर मिळू शकतं. तत्पूर्वी इस्रायलने आणीबाणी जाहीर केली असून लष्करी दलांना अलर्ट केलं आहे.
आयुतुल्ला अली खोमेनींकडून इस्रायलचा निषेध
इराणचे सर्वोच्च नेते आयुतुल्ला अली खोमेनी यांनी या हल्ल्याला ‘क्रूर व रक्तरंजित कृती’ म्हटलं आहे. या हल्ल्याचा निषेध नोंदवत खोमेनी म्हणाले, “इराणविरोधात इस्रायलने केलेल्या या कारवाईचे त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील”. इस्रायल-इराण संघर्षादरम्यान अनेक देशांनी इराण व इस्रायलचं हवाई क्षेत्र मोकळं केलं आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात आयआरजीसीचे कमांडर ठार
दरम्यान, इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या एलिट रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प्सचे कमांडर इन-चीफ जनरल हुसेन सलामी ठार झाले आहेत. २०१९ मध्ये खोमेनी यांनी सलामी यांना या वरिष्ठ लष्करी पदावर नियुक्त केलं होतं. सलामी हे तेहरानमधील आयआरजीसी मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात ठार झाले आहेत.
इराणच्या लष्करातील दुसऱ्या क्रमांकाचा अधिकारी ठार
इस्रायलच्या एअर स्ट्राइकमध्ये इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी इराणी सशस्त्र दलांचे प्रमुख मेजर जनरल मोहम्मद बघेरी यांचा मृत्यू झाला आहे. लष्करी हुद्द्यानुसार ते दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी होते. तसेच जनरल गुलाम अली रशीद या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. खातम अल-अबिया राज्य मुख्यालयाचे ते प्रमुख होते. इराचे सर्वोच्च नेते खोमेनी यांचे सल्लागार व माजी आयआरजीसी कमांडर अली शामखानी देखील गंभीर जखमी आहेत.
सहा अणूशास्त्रज्ञांचा मृत्यू
इस्रायलने इराणचा अणू कार्यक्रम देखील उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. अणू संशोधन केंद्रावर केलेल्या हल्ल्यात अब्दोलहमीद मिनौचेहर, अहमदरेझा झोल्फाघारी, अमीरहोसेन फेखी, मोतालेब्लिझादेह, मोहम्मद मेहदी तेहरांची, फेरेदौन अब्बासी हे सहा प्रमुख अणुशास्त्रज्ञ देखील मृत्यूमुखी पडले आहेत.