नवी दिल्ली : जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या करोना प्रतिबंधक लशींना मान्यतेबाबत भारताचा ज्या देशाशी परस्पर करार झाला आहे, तेथून येणाऱ्या संपूर्ण लसीकरण झालेल्या प्रवाशांना २५ ऑक्टोबरपासून चाचणीशिवाय विमानतळ सोडण्याची परवानगी देण्यात येईल व त्यांना गृह विलगीकरणात राहावे लागणार नाही, असे भारताने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी बुधवारी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले आहे.

तथापि, करोना आरटी-पीसीआर चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल या प्रवाशांना सादर करावा लागणार आहे. प्रवाशांचे अंशत: लसीकरण झाले असले किंवा त्यांनी लस घेतलेली नसली तर त्यांना विमानतळावर येऊन पोहचल्यानंतर करोना चाचणीसाठी नमुना दिल्यानंतरच विमानतळ सोडण्याची परवानगी, ७ दिवस गृहविलगीकरण, भारतात येऊन पोहचल्यानंतर आठव्या दिवशी पुन्हा चाचणी यांसारख्या उपाययोजनांचा अवलंब करावा लागेल. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी १७ फेब्रुवारी २०२१ रोजी किंवा त्यानंतर जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची जागा ही नवी मार्गदर्शक तत्त्वे घेतील, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.