JNU : जम्मू काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तब्बल ९ ठिकाणच्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. तसेच त्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमेवर होणाऱ्या ड्रोन हल्ल्याला देखील चोख प्रत्युत्तर दिलं.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. मात्र, याच काळात तुर्कस्तानने पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला. तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यानंतर भारतातून याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत तुर्कीच्या इनोनू विद्यापीठाबरोबरचा शैक्षणिक सामंजस्य करार रद्द करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव जेएनयू आणि इनोनू विद्यापीठ यांच्यातील शैक्षणिक सामंजस्य करार रद्द करण्यात आला असून आता पुढील सूचना मिळेपर्यंत हा करार स्थगित करण्यात आल्याची माहिती जेएनयू विद्यापीठ प्रशासनाने एक्सवर (ट्विटर) दिली असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. हा सामंजस्य करार ३ फेब्रुवारी रोजी ३ वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आला होता.

दरम्यान, “आम्ही तुर्कीच्या इनोनू विद्यापीठाबरोबरचा सामंजस्य करार रद्द केला असून या करारांतर्गत प्राध्यापकांच्या देवाणघेवाणी आणि विद्यार्थी देवाणघेवाणी कार्यक्रमांसह इतर योजना यामध्ये होत्या”, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयशी बोलताना सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिल्यानंतर तुर्कीविरुद्ध लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत असल्याने जेएनयूने हे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे.

भारतीय प्रवाशांचा दणका, तुर्कियेला जाण्याचे बुकिंग्ज रद्द

भारतीय प्रवाशांनी आठवड्यात त्यांच्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कस्तानला त्यांनी दणका दिला आहे. अझरबैयजान आणि तुर्कीयेतील बुकिंग ६० टक्के कमी झालं आहे. तर मागच्या काही दिवसांमध्ये एकूण बुकिंग रद्द करणाऱ्यांची संख्या २५० टक्के वाढली आहे. आपल्या देशाबद्दल एकजुटीच्या भावनेत आणि आपल्या सशस्त्र दलांच्या प्रति गहिरा आदर व्यक्त करत आम्ही पर्यटकांनी बुकिंग रद्द केली आहेत. त्यांच्या या भावनांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अझरबायजान आणि तुर्कीमध्ये सर्व अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला देतो. या दोन ठिकाणांवर पर्यटनास प्रोत्साहन न देण्यासाठी आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर सर्व प्रकारच्या प्रमोशन्स आणि ऑफर बंद केल्या आहेत असं मेक माय ट्रिपच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे.