नोटाबंदीच्या निर्णयामुळे ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्यात आल्या. या नोटाबंदीनंतर मानवी तस्करीला आळा बसेल असे सुरुवातीला वाटले होते परंतु या व्यवसायात आता २००० च्या नोटेचा सर्वाधिक वापर होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे अशी खंत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी व्यक्त केली. नोटाबंदीनंतर या प्रकारांना पूर्णतः आळा बसेल असे वाटले होते. परंतु केवळ दोन महिन्यातच या व्यवसायातील लोकांकडे २००० च्या नोटा आल्या आहेत आणि त्याचा वापर आता व्यवहारांसाठी होत असल्याचे सत्यार्थी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

नोटाबंदी हा एक मार्ग असू शकतो परंतु मुलांची आणि महिलांची तस्करी थांबावायची असेल तर अनेक उपाय योजना होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. देशामध्ये मानवी संबंधी कायद्यांमध्ये सुधारणा होणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. हे कायदे पीडितांना समजून घेणारे असायला हवे असे ते म्हणाले. यामध्ये तक्रार निवारणाबद्दल तरतुदी असणे आवश्यक असल्याचे सत्यार्थी यांनी म्हटले.

बचपन बचाओ आंदोलन या संस्थेचे प्रमुख सत्यार्थी यांचा काल ६३ वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी मानवी तस्करी, बाल कामगार या प्रश्नांवर चर्चा केली. पश्चिम बंगालमध्ये घरगुती कामांसाठी नोकरभरतीच्या अनेक खोट्या संस्था काम करतात या संस्थामार्फत मानवी तस्करी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तेव्हा या प्रकारांना आळा बसण्यासाठी शासनाने पडताळणीची प्रक्रिया कठोर करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले. तसेच जनतेनी देखील जागरुक राहणे आवश्यक आहे. अशा प्रकारांबाबत समजताच जनतेनी पोलिसांना संपर्क करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे महिला आणि मुलांच्या तस्करीचे प्रमाण कमी झाले, असे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले एका कार्यक्रमावेळी म्हटले होते. ‘नोटाबंदीच्या निर्णयाला जनतेने पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे बेकायदेशीर कारवायांना आळा बसला आहे,’ असे स्मृती इराणी यांनी म्हटले होते. भ्रष्टाचार, दहशतवाद आणि मानवी तस्करी या तिन्ही गोष्टी एका फटक्यात कमी झाल्या असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहरादून येथे झालेल्या कार्यक्रमात म्हटले होते. कैलाश सत्यार्थी यांनी त्यांच्या बचपन बचाओ आंदोलन या संस्थेच्या माध्यमातून हजारो मुलांची बेकायदेशीर मजुरी आणि तस्करीच्या जाचातून सुटका केली आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.