काँग्रेसचे उत्तर-पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी संध्याकाळी दिल्लीतील आपच्या पक्ष कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर जमावाला सामोर जाताना एक व्यक्तीने त्यांच्या कानशिलात लगावली. तसेच, मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यावर शाईफेकही करण्यात आली. या घटनेमध्ये आम आदमी पक्षाच्या स्थानिक नगरसेविका छाया गौरव शर्मा यांच्याशीही जमावाने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

कन्हैया कुमार यांना काँग्रेसनं उत्तर-पूर्व दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. यासंदर्भात कन्हैया कुमार स्थानिक आप नगरसेविका छाया शर्मा यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात आले होते. भेट झाल्यानंतर कन्हैया कुमार कार्यालयातून बाहेर पडत असताना समोर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी जमली होती. या गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने त्यांना हार घालण्याच्या बहाण्याने त्यांच्यावर हल्ला केला. आधी हार घालून नंतर कन्हैया कुमार यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर ही व्यक्ती कन्हैया कुमार यांना मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

या हल्ल्यात संबंधित व्यक्तीबरोबरच आणखीही काही व्यक्ती असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी आपच्या नगरसेविका छाया शर्मा यांच्याशीही गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे. “माझ्या अंगावरची शॉल ओढून घेण्यात आली. माझ्या पतीला बाजूला घेऊन जाऊन धमकावण्यात आलं. जमावावर काळी शाई फेकण्यात आली. या सगळ्या प्रकारा ३ ते ४ महिलाही जखमी झाल्या आहेत”, असं छाया शर्मा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटल्याचं इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

स्वाती मालिवाल मारहाण प्रकरण : ‘आप’कडून आरोपांचे खंडन, भाजपचे केजरीवालांविरोधात कारस्थान असल्याचा आरोप

दोन व्यक्तींनी घेतली जबाबदारी

दरम्यान, या हल्ल्यानंतर दोन व्यक्तींचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपणच कन्हैया कुमार यांना मारल्याचं या व्यक्ती कबूल करताना दिसत आहेत. तसेच, त्यानंतर झालेल्या मारहाणीत आपणही जखमी झाल्याचा दावा या व्यक्ती करताना दिसत आहेत. कन्हैया कुमार यांना कानशिलात लगावणाऱ्या व्यक्तीचं नाव दक्ष असल्याचं सांगितलं जात आहे. “भारत तेरे टुकडे होंगे असं कुणाला म्हणू देणार नाही. कन्हैया कुमारला चांगलीच अद्दल घडवली आहे. या सगळ्यात माझंही डोकं फुटलंय”, असं ही व्यक्ती व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

https://x.com/MrSinha_/status/1791523122023461249

कन्हैया कुमार म्हणतात, “ए साहब…”

दरम्यान, या दोन्ही व्हिडीओंनंतर खुद्द कन्हैया कुमार यांचा एका जाहीर कार्यक्रमात बोलतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हल्ल्यानंतरचा हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे. या व्हिडीओमध्ये कन्हैया कुमार विरोधकांना गुंड पाठवू नका, असं आव्हान देताना दिसत आहेत. “ए साहेब, गुंड लोकांना पाठवू नका. आम्ही तर तुमचे पोलीस, तुमचं तुरुंग पाहिलंय. तुम्हाला जेवढे प्रयत्न करायचे आहेत तेवढे करा. आमच्या नसांमधून स्वातंत्र्य सैनिकांचं रक्त वाहतं. आम्ही काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत. आम्ही जर इंग्रजांना नाही घाबरलो, तर इंग्रजांच्या चमच्यांनाही नाही घाबरणार”, असं थेट आव्हान कन्हैया कुमार या व्हिडीओत देताना दिसत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
https://x.com/nsui/status/1791557444952293614

या प्रकारावरून सत्ताधारी भाजपा व विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगताना दिसत आहे. कन्हैया कुमार यांच्या लोकप्रियतेला घाबरूनच हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.