पीटीआय, बंगळूरु : ‘‘आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना लवकरच खातेवाटप केले जाईल, ’’असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी स्पष्ट केले. विरोधी पक्ष भाजपने हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

शनिवारी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि डी. के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह आठ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, खातेवाटप जाहीर करण्यात आलेले नाही. बुधवारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाचा विधानसभेस परिचय करून दिला तेव्हा बोम्मईंनी हा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, की मुख्यमंत्र्यांनी खातेवाटपानंतर आपल्या सहकाऱ्यांचा परिचय त्यांनी करून दिला असता तर ते योग्य ठरले असते. खातेवाटप लवकर होणे राज्याच्या हिताचे आहे.

त्यावर सिद्धरामय्या यांनी स्पष्ट  केले, की मंत्रिमंडळाचे खातेवाटप लवकरच जाहीर केले जाईल. भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी याआधी मंत्रिमंडळात इतरांचा समावेश करण्याआधी एकमेव सदस्य म्हणून काम केल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली. दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींबरोबर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबद्दल चर्चा करणार आहेत. खातेवाटप करताना सर्व समाज, प्रदेश, गट यांचा समतोल साधण्याचे आव्हान आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षपदी यू. टी. खादेर

कर्नाटक विधानसभेच्या अध्यक्षपदी यू. टी. खादेर यांची बुधवारी एकमताने निवड करण्यात आली. ५३ वर्षीय खादेर हे माजी मंत्री असून, पाच वेळा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम करणारे पहिलेच मुस्लीम नेते असतील.