LIC IPO Listing News : देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी (LIC IPO Listing Update) आज शेअर बाजारात सूचिबद्ध झाली. कंपनीचे शेअर्स सवलतीसह शेअर बाजारात लिस्ट झाले. हे ८६७.२० रुपये म्हणजेच ८.६२ टक्के सूट देऊन बीएससीवर सूचीबद्ध झाले. त्याची इश्यू किंमत ९४९ रुपये होती. म्हणजेच, एका शेअरवर गुंतवणूकदाराला प्रति शेअर ८१.८० रुपयांचा तोटा झाला. एनएसईवर ८.११ टक्के सूट देऊन कंपनीचा स्टॉक रु ८७२ वर लिस्ट झाला.

सुरुवातीच्या व्यापारात, तो १० टक्क्यांहून अधिक घसरून ८६० रुपयांवर आला. दुसरीकडे सोशल मीडियावर मीम्सचा महापूर आला आहे. ज्यांना एलआयसीचे शेअर्स घेता आले नव्हते, त्या लोकांना या बातमीमुळे नक्कीच आनंद झाला असेल. एलआयसीचा आयपीओ हा आजपर्यंतचा देशातील सर्वात मोठा आयपीओ होता. २१,००० कोटींहून अधिक रकमेच्या या आयपीओला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. एलआयसीचा आयपीओ जवळपास तीन वेळा सबस्क्राइब झाला होता. यामध्ये पॉलिसीधारकांचा हिस्सा सहा पटीहून अधिक सबस्क्राइब झाला, तर कर्मचार्‍यांचा वाटा चार पट सबस्क्राइब झाला. आयपीओच्या अँकर भागाने नॉर्वे आणि सिंगापूरमधून सॉवरेन फंड आकर्षित केले आहेत, तर बहुतेक समभाग देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडे गेले आहेत.

विदेशी गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम सातत्याने घसरत होता. नुकत्याच सूचीबद्ध झालेल्या आयपीओ समभागांपैकी कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम सर्वात कमी होता. एलआयसीचा स्टॉक ५ ते १० टक्के सवलतीने लिस्ट केला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत होते. लिस्टींग होण्यापूर्वी, एलआयसीचे शेअर्स ग्रे मार्केट मध्ये ९४९ रुपयांच्या इश्यू किमतीवरून १९ रुपयाच्या सवलतीवर ट्रेड करत होते. ग्रे मार्केटमध्ये त्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत होती. सुरुवातीला या स्टॉकवर ९२ रुपये प्रीमियम दाखवला जात होता. नंतर ते सवलतीत आले.

मुंबईत मुख्यालय असलेले एलआयसी हे भारतातील एक प्रसिद्ध नाव आहे. कंपनीकडे २५ कोटी विमाधारक आहेत आणि विमा बाजारपेठेचा सुमारे दोन तृतीयांश हिस्सा या कंपनीकडे आहे. एलआयसीच्या देशात २००० शाखा, एक लाख कर्मचारी आणि २८.६० पॉलिसी आहेत. ६५ वर्षीय या कंपनीची संपत्ती सुमारे ५०० अब्ज डॉलर इतकी आहे.