येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून अनेक मान्यवर, विविध आध्यात्मिक गुरू, संत, राजकीय नेते यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, राम मंदिरासाठी ९० च्या दशकामध्ये मोठी रथयात्रा काढणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी हेच या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. लालकृष्ण आडवाणी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सोहळ्याला उपस्थित राहू नये, अशी विनंती विश्व हिंदू परिषदेकडून काही ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपस्थितीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. त्यावर आता पडदा पडला आहे.

नेमकी चर्चा कुठून सुरू झाली?

२२ जानेवारी रोजी अयोध्येथ प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याचं जाहीर झाल्यापासून या सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार? यावर चर्चा सुरू झाली होती. त्याचवेळी ९०च्या दशकात राम मंदिराच्या मुद्द्यावरून रथयात्रेच्या माध्यमातून रान उठवणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृ्ष्ण आडवाणी यांची सोहळ्याला उपस्थिती असणारच, असं गृहीत धरून चर्चा होऊ लागल्या. मात्र, काही काळानंतर लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी सोहळ्याला उपस्थित राहू नये, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. त्यामुळे भाजपानं त्यांना बाजूला सारल्याचीही टीका होऊ लागली होती.

लालकृष्ण आडवणारी उपस्थित राहणार!

दरम्यान, आता विश्वहिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार यांनी लालकृष्ण आडवाणी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. एएनआयनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. आलोक कुमार यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते कृष्ण गोपाल व राम लाल यांनी बुधवारी लालकृष्ण आडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण त्यांना दिलं. यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्यांनी भेटीचा तपशील सांगितला.

“लालकृष्ण आडवाणी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अयोध्येत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासाठी लागणाऱ्या वैद्यकीय व इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील”, असं आलोक कुमार म्हणाले.

आधी अडवाणींना राम मंदिर सोहळ्याला येऊ नका म्हटलं, मग निमंत्रण? वाचा नेमकं घडलं काय…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसनं निमंत्रण नाकारलं!

दरम्यान, २२ जानेवारीच्या सोहळ्याला न जाण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी व अधीर रंजन चौधरी यांनी या सोहळ्याला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हा सोहळा म्हणजे भाजपाचा निवडणूक कार्यक्रम असल्याची टीका काँग्रेसकडून या सोहळ्यावर करण्यात आली आहे.