आंबेडकरांची उपहासात्मक टीका

कोपरगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर कोण देश चालवणार, असा सर्वत्र सध्या अपप्रचार सुरू आहे. मी म्हणतो, १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात जर पंतप्रधान होण्यास एकही लायक मनुष्य नसेल तर पुन्हा ब्रिटिशांनाच बोलवावे लागेल, अशी उपहासात्मक टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते  प्रकाश आंबेडकर यांनी केली.

मोदींनी केलेली नोटबंदी व त्यानंतर नोट बदलणे हा देशाच्या काळ्या अर्थव्यवस्थेला लुटणारा निर्णय होता. अशा डाकू, लुटारू पंतप्रधानाला व सत्ताधाऱ्यांना पुन्हा सत्तेवर आणू नका, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

शिर्डी लोकसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांच्या प्रचारार्थ कोपरगाव येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी आघाडीचे राज्य प्रवक्ते प्रा. किसान चव्हाण, दिशा शेख, आड. अरुण जाधव, सुनील शिरसाठ ,भारिपचे उत्तर जिल्हा प्रमुख किरण साळवे ,महासचिव दिलीप वाघमारे, रामचंद्र भरांडे, डॉ. जालिंदर घिगे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. सकाळी दहा वाजता होणारी सभा तब्बल तीन तास उशिराने सुरू झाली. आंबेडकर पुढे म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने  मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी प्रमुख आरोपी असलेल्यांना भोपाळमध्ये उमेदवारी दिली. त्यातून त्यांचा खोटा चेहरा समोर आला आहे. संघ मनुवादाचा पुरस्कार करत असून ज्या दिवशी देशात हिंदू-मुस्लीम ऐक्य होईल, त्या दिवशी हा संघ डब्यात गेल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही त्यांनी केली. भाजपा व काँग्रेस-राष्ट्रवादी काँगेसचा विचार, आर्थिक धोरणे, सामाजिक प्रश्न एकसारखे असून हे दोघे एकत्र आले तर मुस्लिमांना तोंड बडवावे लागेल.

भाजपा सरकारने गेल्या पाच वर्षांत देश डबघाईला नेला असून जीएसटी व नोटाबंदीमुळे अर्थ व्यवस्था ढासळली आहे. पुलगामा हल्लय़ाचे सुद्धा पंतप्रधान मोदी राजकारण करतात मात्र पुलगमा हल्लय़ानंतर पाकिस्तानवर हल्ला करायला १४ दिवस का लावले याचे उत्तर मोदीकडे नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना अमेठीतून पराभव दिसत असल्याने त्यांनी वायनाडमधून उमेदवारी दाखल केली असून ज्या पक्षाच्या सेनापतीमध्ये निवडून येण्याचा आत्मविश्वास नाही, तेथे त्याचे सैनिक काय निवडून येणार, राहुल गांधी हा पळपुटेपणा बारामतीकडून शिकले असल्याची टीका  आंबेडकर  यांनी या वेळी केली.

भारत देशाच्या चलनावर गव्हर्नरची सही असते. देशाच्या वतीने चलनाचे आर्थिक मूल्य देण्यास बांधील असल्याचे ते जाहीर करतात. गव्हर्नरला हा अधिकार संसद देते. त्यामुळे ज्या चलनावर मोदींचा अधिकार नाही. त्या बदलण्याचा निर्णय त्यांनी कसा व कोणत्या अधिकारात घेतला, असा जाहीर सवालही आंबेडकर यांनी विचारला.

उमेदवार संजय सुखदान यांना या वेळी विविध सामाजिक संघटना व व्यक्तिगत कार्यकर्त्यांनी लाखो रुपयांचे धनादेश व रोख रक्कम देऊ  केली.