भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांनी शनिवारी (२ मार्च) पत्रकार परिषद घेऊन देशातील १६ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील १९५ उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये २८ महिला उमेदवारांची नावंदेखील आहेत. पहिल्या टप्प्यात जाहीर केलेल्या यादीनुसार भाजपाने ३४ विद्यमान मंत्र्यांना पुन्हा एकदा लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, पक्षाने चित्रपट आणि टीव्ही कलाकारांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

सत्ताधारी पक्षाने बॉलिवूड, भोजपुरी, बंगाली, दाक्षिणात्य चित्रपट आणि मालिकांमधील अभिनेते तसेच अभिनेत्रींना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी या उत्तर प्रदेशमधील मथुरा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत. भाजपाने त्यांना यंदा तिसऱ्यांदा मथुरेतून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यापाठोपाठ भोजपुरी अभिनेता पवन सिंहला पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट दिलं आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे सध्या आसनसोलचे खासदार आहेत.

भाजपाने जाहीर केलेल्या १९५ उमेदवारांच्या यादीत पवन सिंह याच्यासह अनेक भोजपुरी स्टार्स आहेत. मनोज तिवारी, रवी किशन, दिनेश लाल यादव निरहुआ यांनादेखील भाजपाने लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे.

भाजपाचा भोजपुरी स्‍टार्सवर विश्वास, ४ खासदारांचं तिकीट कापलं

भाजपाने दिल्लीतल्या सातपैकी पाच लोकसभा जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यापैकी चार विद्यमान खासदारांचं तिकीट कापलं आहे. परंतु, उत्तर पूर्व दिल्लीचे खासदार आणि अभिनेते मनोज तिवारी यांच्यावर भाजपाने पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मनोज तिवारी यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तब्बल साडेतीन लाख मतांच्या फरकाने पराभूत केलं होतं. ते दोन वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. तिवारी यंदा तिसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

भाजपाने गोरखपूरचे विद्यमान खासदार आणि अभिनेते रवी किशन यांना पुन्हा एकदा लोकसभेचं तिकीट दिलं आहे. २०१९ च्या निवडणुकीत रवी किशन यांनी समाजवादी पार्टीचे उमेदवार रामभुआल निषाद यांचा तीन लाख मतांनी पराभव केला होता.

भोजपुरी स्टार निरहुआ आझमगडमधून लोकसभेच्या मैदानात

भाजपाने उत्तर प्रदेशच्या आझमगड लोकसभा मतदारसंघातून भोजपुरी स्टार दिनेश लाल यादव निरहुआ याला तिकीट दिलं आहे. २०१९ च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी निरहुआचा अडीच लाख मतांनी पराभव केला होता. परंतु, त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत निरहुआने सपा उमेदवार धर्मेंद्र यादव यांच्यावर मात केली होती. निरहुआला यंदा पुन्हा एकदा याच मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

केरळमध्ये लोकप्रिय अभिनेत्याला उमेदवारी

भोजपुरी अभिनेत्यांसह भाजपाने केरळच्या त्रिसुर मतदारसंघातून अभिनेता सुरेश गोपी याला लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. सुरेश गोपी हा लोकप्रिय अभिनेता आणि पार्श्वगायकदेखील आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सुरेश गोपीच्या नावाचा बोलबाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लॉकेट चॅटर्जी यांना हुबळीमधून लोकसभेची उमेदवारी

भाजपाने पश्चिम बंगालच्या हुबळी मतदारसंघातून लॉकेट चॅटर्जी यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. लॉकेट चॅटर्जी सध्या येथील विद्यमान खासदार आहेत. लॉकेट या लोकप्रिय बंगाली अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना आहेत.