Madan Shah Tears His Own Clothes After RJD Denies Him Ticket For Bihar Assembly Elections: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या निवासस्थानाबाहेर आज एक नाट्यमय दृश्य पाहायला मिळाले. राजदचे ज्येष्ठ नेते आणि मधुबन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले मदन शाह यांना पक्षाने तिकीट नाकारले. यानंतर त्यांचा भावनिक उद्रेक पाहायला मिळाला. तिकीट नाकारल्यामुळे निराश झालेल्या मदन शाह यांनी स्वतःचा कुर्ता फाडला आणि लालू प्रसाद यादव यांच्या घरासमोरच रस्त्यावर लोळून मोठ्याने रडले. या प्रकारामुळे लालू प्रसाद यांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ उडाला. दरम्यान, ही घटना व्हिडिओमध्ये कैद झाली असून सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मदन शाह यांनी आरोप केला आहे की, त्यांनी तिकिटासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. थेट आरोप करताना त्यांनी राज्यसभा खासदार संजय यादव यांचे नाव घेतले. “पक्षाने माझ्यासारख्या प्रामाणिक आणि कष्टाळू कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे. ते आता पैसे देणाऱ्यांना प्राधान्य देत आहेत,” असे मदन शाह रडत रडत म्हणाले.

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मदन शाह, लालू प्रसाद यादव यांच्या पाटण्यातील निवासस्थानाबाहेर जाऊन त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. अखेर सुरक्षा कर्मचाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी शाह यांना परिसरातून हटवले.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मदन शाह म्हणाले की, “त्यांचे सरकार येणार नाही. तेजस्वी खूप गर्विष्ठ आहेत, लोकांना भेटत नाहीत. तेच तिकीटांचे वाटप करत आहेत. मी इथे मरण्यासाठी आलो आहे. लालू यादव माझे गुरु आहेत. त्यांनी मला तिकीट देण्याचे सांगितले होते. पण माझ्याऐवजी भाजपा एजंट संतोष कुशवाह यांना तिकीट दिले.”

“२०२० मध्ये, लालूंनी मला रांचीला बोलावले आणि तेली समाजाच्या लोकसंख्येबाबत एक सर्वेक्षण केले. त्यांनी सांगितले की, मदन शाह मधुबन मतदारसंघातून रणधीर सिंग यांना पराभूत करतील. तेजस्वी आणि लालूंनी मला फोन केला होता, त्यांनी सांगितले होते की ते मला तिकीट देतील. मी ९०च्या दशकापासून पक्षासाठी काम करत आहे. यासाठी मी माझी जमीन विकली आहे,” असेही ते म्हणाले.