मध्य प्रदेशातील गुना येथे भीषण अपघातात भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (९ एप्रिल) रात्री उशिरा घडली. भाजपाचे नेते घरी आराम करत होते. मात्र, यावेळी एका मित्राने त्यांना फोन करुन बाहेर बोलावले. यानंतर ते मित्राला भेटण्यासाठी जात असताना एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला पाठिमागून धडक दिली. यामध्ये भाजपा नेते आनंद रघुवंशी, सरपंच कमलेश यादव यांचा मृत्यू झाला. मनोज धाकड हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गुना येथे झालेल्या भीषण अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघाताबाबत गुना येथील पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, हा अपघात घडला त्या चारचाकीचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. भरधाव वेगाने कार चालवत असताना कारच्या ब्रेकखाली बिअरची बॉटल आडवी आल्यामुळे हा संपूर्ण अपघात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कारण पोलिसांना तपासावेळी कारच्या ब्रेकखाली बिअरची बॉटल अडकल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक

या घटनेनंतर गुना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कार चालक सौरभ यादव (वय २७) आणि त्याचा एक सहकारी आभास शांडिल्य (वय २४) यांनी वाहन चालवताना नशा केली होती, असे आढळून आल्याचे दाखल केलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे. हे आरोपी नोएडा आणि हैदराबाद येथील रहिवासी असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या दोघांनाही न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास सुरु असून वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, गुना येथील भीषण अपघाताच्या घटनेत भाजपाच्या दोन नेत्यांचा मृत्यू झाल्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी त्यांचे सर्व निवडणूक कार्यक्रम रद्द करत अपघातात मृत्यू झालेल्या दोन्ही भाजपा नेत्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.