मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्लीत असून गुरुवारी रात्री उशीरा त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदे यांची गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणत्याही केंद्रीय नेत्यांशी भेट झाली नव्हती. पण रात्री उशिरा ते अमित शाह यांच्या भेटीसाठी पोहोचले. दोघांमध्ये जवळपास ४० मिनिटं चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये शिवसेनेसह असलेला संघर्ष, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, दसरा मेळावा अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांनी मात्र ही सदिच्छा भेट होती असं म्हटलं आहे.

शिवसेनेचे १३ राज्यांतील प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात सामील झाल्याच्या निमित्त बुधवारी महाराष्ट्र सदनामध्ये जंगी कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम संपल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे मुंबईला रवाना होणार असल्याचे सांगितलं जात होतं. पण, त्यांचा गुरुवारीही दिल्लीत मुक्काम होता. मुख्यमंत्री शिंदे केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी दिल्लीत थांबल्याचं बोललं जात होतं. मात्र, गुरुवारी संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांची एकाही केंद्रीय मंत्र्याची भेट झाली नसल्याने चर्चा रंगली होती.

एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत अमित शाह यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी अमित शाह यांची सदिच्छा भेट घेतल्याचं म्हटलं आहे. या भेटीदरम्यान राज्यातील विकासकामांसह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

एकनाथ शिंदेंचं ट्वीट

अनेक केंद्रीय मंत्र्यांची भेट होऊ शकली नाही –

एकनाथ शिंदे राज्यातील काही कायदेशीर बाबींसंदर्भात केंद्रीय विधिमंत्री किरण रीजिजू यांची भेट घेणार होते. पण, ते दिल्लीत नसल्याने एकनाथ शिंदे यांनी फोनवरुनच त्यांच्याशी चर्चा केली.

केंद्रीय वाहतूक व रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी व केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचीही एकनाथ शिंदे भेट घेणार असल्याची चर्चा होती. पण, या केंद्रीय मंत्र्यांपैकी एकाचीही त्यांची भेट होऊ शकली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्यांनी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात दोघांची सविस्तर चर्चा झाली. गडकोटांचे संवर्धन, मुंबई ते किल्ले रायगड असे सी फोर्ट सर्किट टुरिझम यासंदर्भातही चर्चा करण्यात आली.