भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्येने बुधवारी ३२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या २४ तासात ६७ हजार १५१ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. तर १०५९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारतात सध्या करोना रुग्णसंख्या ३२ लाख ३४ हजार ४७५ इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. यापैकी ७ लाखांहून अधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रामध्ये रुग्णसंख्येचे प्रमाण खूपच जास्त आहे. महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने सात लाखांचा टप्पा ओलांडला असून महाराष्ट्र एखादा देश असता तर सर्वाधिक करोना रुग्णांच्या यादीत तो पाचव्या स्थानावर असता अशी सध्याची आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या अमेरिकेमध्ये आहे. त्या खालोखाल ब्राझील, भारत आणि रशियाचा क्रमांक लागतो. याच यादीमध्ये दक्षिण आफ्रिका पाचव्या, पेरु सहाव्या, मेक्सिको सातव्या, कोलंबिया आठव्या, स्पेन नवव्या आणि चिली दहाव्या स्थानी आहे. पाचव्या क्रमाकांवर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील करोनाबाधितांची संख्या सहा लाख १३ लाखांच्या आसपास आहे. म्हणजेच जगामध्ये सर्वाधिक करोनाबाधित असणाऱ्या अव्वल दहा देशांपैकी सहा देशांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी करोनाबाधित आहेत. सर्वाधिक करोनाबाधित रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये महाराष्ट्राचा समावेश केल्यास सर्वाधिक करोनाबाधित असणारा तो पाचव्या क्रमांकाचा प्रदेश असेल.

करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र अद्यापही पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णसंख्या सात लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रानंतर दाक्षिणात्य राज्यं तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचा क्रमांक आहे. एकीकडे राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात १० हजार ४२५ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. नव्याने आढळलेल्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजेच १२ हजार ३०० रुग्ण मंगळवारी बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत करोनावर मात करुन बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही ५ लाखांच्या वर केली असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ७३.१४ टक्क्यांवर आलं आहे.

देशातही करोनाबाधितांचा रिकव्हरी रेट चांगला आहे.  देशात सध्या सात लाखांहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर २४ लाख ६७ हजार ७५९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. भारतात आतापर्यंत एकूण ५९ हजार ४४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. भारतातील रिकव्हरी रेट वाढला असून ७५.९२ टक्के झाला आहे. गेल्या २५ दिवसांत १०० टक्क्यांहून अधिक प्रगती झाली असल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.