मणिपूरमधील दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यानंतर याप्रकरणात मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र, याआधी अनेक उच्चस्तरीय बैठकाही होऊनही गुन्हा दाखल झाल्यावर तब्बल ६२ विवस्त्र करत धिंड काढून सामूहिक बलात्कार केल्याचं हे प्रकरण धुळखात पडलं होतं, हे आता स्पष्ट झालं आहे.

४ मे २०२३ रोजी मणिपूरमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. यानंतर १८ मे रोजी या भयानक प्रसंगाने भेदरलेल्या पीडितेच्या पतीने पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आणि गुन्हा दाखल झाला. जमावाने पीडित महिलेच्या गावावर हल्ला केलेला असल्याने आणि तिच्या जीवाला धोका असल्याने पीडितेसह तिच्या पतीला आपलं गाव सोडून दुसऱ्या जिल्ह्यात जावं लागलं. त्यानंतर हा गुन्हा घटना घडली त्या जिल्ह्यात स्थलांतरीत होण्यासाठीच एक महिना लागला. तसेच व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरच पोलिसांनी आरोपींविरोधात कारवाई केली.

हेही वाचा : आधी नग्न करत धिंड काढली, मग सामूहिक बलात्कार; मणिपूरमधील पीडितेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

“मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच, आतापर्यंत ६ हजार गुन्हे दाखल”

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. यावेळी त्यांना या दिरंगाईबाबत विचारलं असता ते म्हणाले, “राज्यात हिंसाचार सुरूच आहे आणि आतापर्यंत ६ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस हे कोणतं प्रकरण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करत होते. या व्हिडीओची ओळख पटल्यानंतर आम्ही मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली.”

मणिपूर हिंसाचारावर अनेक उच्चस्तरीय बैठका, मात्र विवस्त्र धिंडीची दखल नाही

विशेष म्हणजे मणिपूरमध्ये हा संतापजनक प्रकार घडल्यानंतर राज्यासह दिल्लीत मणिपूर हिंसाचारावर अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या. २७ मे रोजी चिफ ऑफ आर्मी स्टाफ मनोज पांडे यांनी मणिपूरला भेट देत सुरक्षेचा आढावा घेतला. २९ मे रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चार दिवसीय मणिपूर दौरा करत सुरक्षाविषयक अनेक बैठका केल्या. तसेच विविध समाजघटकांशी चर्चा केल्या.

हेही वाचा : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

४ जून २०२३ रोजी केंद्र सरकारने गुवाहटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश अजई लांबा यांच्या नेतृत्वात चौकशी आयोगाची स्थापना केली. १० जून रोजी नॉर्थ इस्ट डेमॉक्रेटिक अलायन्सचे प्रमुख आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी इंफाळला भेट दिली. तसेच मणिपूरचे मुख्यमंत्री सिंह यांच्यासह अनेकांबरोबर बैठका केल्या. त्यांनी आसाममधील कुकी समाजाच्या नेत्यांशीही चर्चा केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२४ जून रोजी गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक दिल्लीत पार पडली. यानंतर २६ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली. यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.