परकीय चलनांसमोर घरंगळत रुपया रसातळाला जात असताना आणि अर्थव्यवस्थेला जोरदार हादरे बसत असताना अर्थतज्ज्ञ पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी प्रथमच संसदेत मौन सोडले आणि आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम नेटाने राबविण्याची हमी देतानाच या आर्थिक संकटाचे खापर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील बदलांबरोबरच भारतीय जनता पक्षावरही फोडले!
रुपयाची घसरण निश्चितच चिंताजनक असल्याचे मान्य करतानाच, पण त्याने भारतीय अर्थव्यवस्था कोलमडेल, हा तर्क सिंग यांनी फेटाळून लावला. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत आहे आणि आपली बँकिंग यंत्रणाही सक्षम आहे, असे ते म्हणाले.
अर्थकारणाचा पाया शाबूत राहावा यासाठी काही कठोर पावले उचलावीच लागतील. आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम आकुंचित केला जाणार नाही. भांडवलावरही नियंत्रण आणण्याचा आमचा विचार नाही. आपली अर्थव्यवस्था पूर्वीसारखीच सक्षम आणि प्रगत व्हावी यासाठी राजकीय सहमतीने नजीकच्या भविष्यात काही कठोर आर्थिक निर्णय घेण्याची गरजही त्यांनी मांडली.
या आर्थिक संकटाला प्रमुख विरोधी पक्ष भाजपही जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. भाजपने संसदेच्या कामकाजात वारंवार आणि सातत्याने अडथळे आणले आणि आर्थिक सुधारणांना चालना देणारी अनेक महत्त्वाची विधेयके रोखली. गुंतवणूकदारांच्या अपेक्षांनाही त्यामुळे सुरुंग लागला, असा आरोपही सिंग यांनी आक्रमकपणे केला. भाजपच्या बाकांवरून त्यांच्या टीकेला जोरदार आक्षेप घेतला जात होता.
सध्याची वित्तीय तूट कमी करण्यासाठीही सरकार ठोस पावले उचलेल. परकीय गुंतवणुकीचा प्रवाह अखंड राहावा व वाढावा, यासाठीही सरकार पावले उचलेल. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी भांडवल नियंत्रणाचा मार्ग स्वीकारणार नाही, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

‘चोर’ आरोपाने व्यथित
भाजपवर टीका करताना राज्यसभेत मनमोहन सिंग म्हणाले की, जगात असा कोणता देश आहे ज्याच्या पंतप्रधानांना विरोधकांच्या गोंधळामुळे आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांची ओळखही करून देता आली नाही? जगात असा कोणता देश आहे, ज्याच्या संसदेत ‘पंतप्रधान चोर है’ अशा घोषणा विरोधकांनी दिल्या, असा व्यथित सवाल सिंग यांनी केला. त्यावर विरोधी पक्षनेते अरुण जेटली हे तात्काळ उभे राहिले आणि ज्याच्या पंतप्रधानांनी आपली सत्ता टिकवण्यासाठी काही खासदार विकत घेतले, असा तरी देश जगात दुसरा आहे काय, असा सवाल केला.

रुपयाचे अवमूल्यन ही बाह्य़ घडामोडींची आपल्याकडे उमटलेली प्रतिक्रिया आहे.
रुपयाचे अवमूल्यन आणि तेलाच्या वाढत्या किंमती यामुळे महागाई आणखी वाढेल.
केवळ आपल्याच रुपयाची नाही, तर तुर्कस्थान, ब्राझील आदी देशांच्या चलनाचीही घसरण झाली आहे.