scorecardresearch

…म्हणून निवडणुकीच्या तोंडावर अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले, भाजपाने साधली राजकीय समीकरणं

भारतातल्या अनेक राज्यांमधले राज्यपाल नुकतेच बदलण्यात आले. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना राज्यपाल म्हणून संधी देण्यात आली आहे.

governors replaced to prevent factionalism in BJP
नागालँडचे नवे राज्यपाल एल. ए. गणेशन आणि आसामचे नवे राज्यपाल गुलाबचंद कटारिया. (PC : Indian Express FIle)

देशातल्या अनेक राज्यांमध्ये रविवारी (१२ फेब्रुवारी) राज्यपाल बदलण्यात आले. वेगवेगळ्या राज्यांमधल्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याचे पक्षातल्या सूत्रांनी जनसत्ताला सांगितले होते, नेमकं तसंच घडलं. असं म्हटलं जात आहे की, राज्यपालांच्या नियुक्त्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या आहेत. आसामचे नवीन राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे सध्या राजस्थानच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. आगामी निवडणुकांमध्ये ते मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदारदेखील होते. राजस्थानमध्ये यावर्षीच्या अखेर विधानसभा निवडणूक होणार आहे.

राजस्थानमध्ये पक्षांतर्गत गटबाजी होऊ नये, पक्ष एकसंध राहावा यासाठी पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व धडपडत असल्याचं बोललं जात आहे. कटारिया यांची विरोधी पक्षनेतेपदावरून आता राज्यपालपदी नियुक्ती झाल्याने राज्यातलं पक्षीय समीकरण पक्षाने साधलं आहे. अंतर्गत गटबाजीचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे.

मेघालय आणि नागालँडमध्ये अनुभवी राज्यपालांची आवश्यकता

येत्या २७ फेब्रुवारी रोजी मेघालय आणि नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपामधील सूत्रांनी सांगितले की, पक्षाला या दोन्ही राज्यांच्या राजभवनात अनुभवी चेहरे हवे आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये अनेकदा राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. येथील राजकीय समीकरणं सतत बदलत असतात, असा इथला आजवरचा इतिहास आहे. अशा परिस्थितीत राज्यपाल हे निवडणुकीनंतर महत्त्वाची भूमिका निभावू शकतात. त्यामुळेच बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर मणिपूरचे राज्यपाल हे या आधी पश्चिम बंगालचे कार्यकारी राज्यपाल होते. दुसऱ्या बाजूला एल. गणेशन यांची नागालँडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

हे ही वाचा >> बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, सहा राज्यांमध्ये नवे चेहरे

तमिळनाडूमधल्या दोन नेत्यांमधल्या मतभेद मिटवला

माजी लोकसभा खासदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सी. पी. राधाकृष्णन आता स्पर्धेतून बाहेर झाल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांची स्थिती मजबूत झाली आहे. असं म्हटलं जात आहे की, राधाकृष्णन आणि प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांच्यात अनेक मतभेत होते. अण्णमलाई यांच्या कार्यपद्धतीवर राधाकृष्णन यांना आक्षेप होता. परंतु राज्यात पक्षासाठी केलेल्या कामांमुळे पक्षाचं राष्ट्रीय नेतृत्व अण्णामलाई त्यांच्यावर खूश आहे. यासह अण्णामलाई यांना कर्नाटक निवडणुकीसाठी त्यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील एका नेत्याने सांगितलं की, पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते राधाकृष्णन आता शांत झाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-02-2023 at 08:23 IST

संबंधित बातम्या