पीटीआय, कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीवर महाविद्यालयाच्या आवाराबाहेरच तीन अनोळखी व्यक्तींनी सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील दुर्गापूर येथे शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. तिच्यावर नजिकच्याच रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ही विद्यार्थिनी मूळची ओडिशा राज्यातील जलेश्वर येथील रहिवासी आहे. ती मैत्रिणीबरोबर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जेवणासाठी बाहेर गेली होती. तिला मैत्रिणीने महाविद्यालयाच्या आवाराबाहेर सोडल्यानंतर तीन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. त्यांनी मुलीकडचा मोबाइल फोन खेचून घेतला आणि तिला नजिकच्या जंगलात घेऊन गेले. तेथे अत्याचार केल्यानंतर त्यांनी ‘याविषयी कोणाला सांगितलेस, तर परिणाम भोगावे लागतील,’ अशी धमकी दिली. मोबाइलच्या बदल्यात त्यांनी पीडितेकडून पैशाची मागणीही केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आतापर्यंत पीडितेच्या मैत्रिणींचाही जबाब नोंदवला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मिळवून त्यामार्फत तपासाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच घटनास्थळावरून गुन्ह्यासंदर्भात नमुने मिळवण्यासाठी तज्ज्ञ पथकाला पाचारण करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

बंगालमधील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले असून पोलीस त्यावर प्रतिबंधक उपाययोजना करण्यात अपयशी ठरते आहेत. हे खूप दुर्दैवी आहे. याबाबत आता मुख्यमंत्र्यांनाच लक्ष घालण्याची विनंती आपण करणार आहोत, असे राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य अर्चना मजुमदार यांनी सांगितले.

ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांना चिंता

ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी ‘एक्स’ समाजमाध्यमावर या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करत या प्रकरणात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वत: आरोपींच्या अटकेसाठी लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात ओडिशा सरकारकडून पीडित मुलीच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी सहकार्य देण्यात येत असून त्यासंदर्भात राज्याचे अधिकारी पश्चिम बंगालच्या शासकीय अधिकाऱ्यांच्याही संपर्कात आहेत.