शिलाँग : काँग्रेसच्या मेघालयमधील १७ पैकी १२ आमदारांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. देशातील ‘विभाजक शक्तींना’ तोंड देण्यात काँग्रेसला अपयश आल्याचा ठपका या आमदारांचे नेते मुकुल संगमा यांनी ठेवला. बंडखोर आमदारांच्या या निर्णयामुळे, आतापर्यंत राज्यात अस्तित्व नसलेला ममता बॅनर्जी यांचा पक्ष आघाडीचा विरोधी पक्ष ठरला आहे.

या घडामोडीमुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या आधीच असलेल्या ‘जायंट किलर’ या प्रतिमेला आणखी बळ मिळाले आहे. नजीकच्या भविष्यकाळात बंगालमध्ये सत्तेवर येण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा त्यांनी धुळीला मिळवली होती; तसेच प्रशांत किशोर यांची प्रभावी निवडणूक रणनीतीकार ही प्रतिमाही बळकट केली होती.

आपली निष्ठा बदलण्याच्या निर्णयाचे मूळ, अधिकाधिक बळकट होणाऱ्या भाजपशी लढा देण्यातील काँग्रेसच्या अपयशात असल्याचे संगमा यांनी सांगितले. २०१० ते २०१८ या कालावधीत ते मेघालयचे मुख्यमंत्री होते.