अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांच्या एका खळबळजनक दाव्यामुळे पाकिस्तानाच्या कुरापती पुन्हा एकदा जगासमोर आल्या आहेत. तर भारताच्या माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दाखवलेली चाणाक्ष वृत्ती भारताच्या कामी आली असल्याचे एका प्रसंगातून पुढे आले आहे. ‘नेव्हर गिव्ह अ‍ॅन इंच : फायटिंग फॉर द अमेरिका आय लव्ह’ या पुस्तकात पॉम्पियो यांनी लिहिले की, भारताने केलेल्या बालाकोट सर्जिकल स्ट्राइक नंतर पाकिस्तान अणुबॉम्ब टाकण्याच्या तयारीत होता. मात्र सुषमा स्वराज यांनी वेळीच संकट टाळण्यासाठी पुढाकार घेतला आणि अनर्थ टळला.

ती रात्र मी कधीही विसरु शकत नाही

आपल्या पुस्तकात पॉम्पियो लिहितात की, ही गोष्ट २७-२८ फेब्रुवारी २०१९ ची आहे. मी अमेरिका – उत्तर कोरिया शिखर संमेलनामध्ये होतो. त्याचवेळी आम्हाला सुषमा स्वराज यांनी दिलेल्या माहितीनंतर रात्रभर जागून काम करावे लागले होते. एक मोठं संकट टाळण्यासाठी आम्ही रात्रभर दिल्ली आणि इस्लामाबादमधील संबंधितांशी चर्चा करत होतो. जगाला त्या रात्रीविषयी कळले पाहिजे की तेव्हा भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या जवळ पोहोचले होते.

सुषमा स्वराज यांनी मला झोपेतून उठवले

पॉम्पियो यांनी या प्रसंगाची माहिती देताना सुरुवातीला पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. ज्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. या स्ट्राईकनंतर पाकिस्तानचा जळफळाट झाला आणि त्यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या बदल्यात अणुबॉम्ब टाकण्याची योजना बनवली. मात्र सुषमा स्वराज यांनी वेळीच निर्णय घेत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांना याची माहिती दिली. आपल्या पुस्तकात पॉम्पियो म्हणाले की, भारताच्या तत्कालिन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आपल्याला झोपेतून उठविले होते. पाकिस्तानने हल्ला केल्यास प्रतिहल्ल्याची भारतही तयारी करत असल्याचे स्वराज यांनी सांगितल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. ‘अणुयुद्ध खूप जवळ येऊन ठेपले होते, इतकेच मला माहिती होते’, असे पॉम्पियो यांनी म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पॉम्पियो यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्याशी संवाद साधला आणि त्यानंतर पाकिस्तानचे सेनाप्रमूख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याशीही चर्चा केली. बाजवा यांनी सुरुवातील अणुयुद्धाची शक्यता फेटाळून लावली. पॉम्पियो यांनी त्यांची समजूत काढली आणि भारताला माहिती दिली की पाकिस्तान अणुयुद्धाची तयारी करत नाही.