सोनार उपकरण असलेल्या नौदलाच्या जहाजाला किनारा रक्षक दलाच्या बेपत्ता डॉर्नियर विमानाकडून संदेश मिळाले आहेत. हे विमान आठ जूनला तामिळनाडू किनाऱ्यावरून बेपत्ता झाले होते. त्यात तीन जण होते.
किनारा रक्षक दलाचे कमांडर व महानिरीक्षक एस. पी. शर्मा यांनी चेन्नईत सांगितले, की आयएनएस संधायक या जहाजाला विमानाकडून संदेश मिळाले आहेत. विमानाकडून सोनार यंत्रणा शोधू शकणाऱ्या उपकरणाकडून संदेश मिळाले असून, ते ३० दिवसांपर्यंत मिळू शकतात. संधायक या जहाजाने कारयकल व कडलोर किनारपट्टीवर ११ व १२ जूनला संदेश पकडण्याचे काम सुरू केले. सोनार उपकरणाद्वारे संदेश सागरात खोलवर सोडण्यात आले व त्यानंतर विमानाकडून परावर्तित झालेले संदेश मिळाले आहेत. असे असले तरी विमानाचा नेमका ठावठिकाणा सापडलेला नाही. डॉर्नियर विमान तामिळनाडूच्या किनारपट्टीवर टेहळणी उड्डाणावर असताना रात्री ९.२३ वाजता बेपत्ता झाले. राज्य व केंद्राच्या अनेक संस्थांनी या विमानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते सापडले नाही.