नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर केलेल्या क्रूर अतिक्रमणाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय चर्चेत विधायक आणि सडेतोड चर्चा करतील, अशी माहिती रविवारी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी दिली.

टोक्योमध्ये २४ मे रोजी क्वाड नेत्यांची शिखर परिषद होत आहे. त्यानिमित्त बायडेन-मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. 

भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्याबाबत सुलिव्हन यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, क्वाड परिषदेत अन्नसुरक्षा हा चर्चेचा विषय असेल.

मोदी आणि बायडेन यांच्यात युक्रेनवर होणारी चर्चा ही काही नवी नाही. त्यांनी आधीच यावर चर्चा सुरू केली आहे. ती पुढे सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वन या विमानात ते वार्ताहरांशी बोलत होते.

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे रविवारी क्वाड परिषदेसाठी रवाना झाले. बायडेन यांच्याशी होणाऱ्या चर्चेत भारत-अमेरिका संबंध दृढ केले जातील. क्वाड नेत्यांशी हिंद-प्रशांत क्षेत्र आणि जागतिक स्तरावरील घडामोडींची चर्चा केली जाईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.