भारतासह जगभरातील अनेक देशातील नागरिकांना ‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य बघण्याची संधी मिळाली. अनेकांनी हा ग्रहण डोळ्यात साठवून घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीही हे सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी तयारीही केली. पण, ऐनवेळी पंतप्रधानांना लाईव्ह प्रक्षेपणाद्वारेच सूर्यग्रहण बघावे लागले. इतर भारतीयांप्रमाणेच आपणही हे सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होतो, पण दुर्दैवानं बघता आले नाही, असं म्हणत मोदींनी नाराजीही व्यक्त केली.

‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहण गुरूवारी बघायला मिळाले. यंदाच्या वर्षांतील हे शेवटचे सूर्यग्रहण होते.  पृथ्वीच्या पूर्व गोलार्धातून भारत, सौदी अरेबिया, कतार, मलेशिया,ओमान, सिंगापूर, श्रीलंका, मरिना बेटे व बोरनिओ येथील नागरिकांना हे सूर्यग्रहण बघता आले. सूर्य व पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र आल्यानंतर कंकणाकृती सूर्यग्रहणाला सुरूवात झाली. भारतात सकाळी ७.५९ वाजता ग्रहणाला सुरुवात झाली. कंकणाकृती अवस्था सकाळी ९ वाजता दिसून आली.

भारतातील अनेक शहरात हे सूर्यग्रहण दिसले. मात्र, ढगाळ वातावरण असल्यानं अनेक ठिकाणी लोकांचा हिरमोड झाला. हे सूर्यग्रहण बघण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुद्धा उत्सुक होते. त्यांनी सूर्यग्रहण बघण्यासाठी तयारीही केली होती. मात्र, ऐनवेळी ढगाळ वातावरण तयार झाल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूर्यग्रहण थेट बघता आले नाही. याबद्दल त्यांनी ट्विट करून खेद व्यक्त केला.

मोदी म्हणाले, “इतर भारतीयांप्रमाणेच मी सुद्धा हे कंकणाकृती सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होतो. पण, दुर्दैवानं हे सूर्यग्रहण बघू शकलो नाही, कारण ढगाळांमुळे सूर्य झाकोळून गेला. त्यामुळे मी कोझीकोडे आणि इतर भागातून दिसलेलं सूर्यग्रहण लाईव्ह बघितलं. या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा केल्यामुळे या विषयातील माझ्या ज्ञानातही भर पडली आहे,” असं ट्विट मोदी यांनी केलं आहे.