लोकसभेत भाजपा खासदार रमेश बिधुरी यांनी बहजुन समाज पार्टीच्या खासदाराला शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लोकसभेतील भाषणावेळी रमेश बिधुरी बसपा खासदार दानिश अली यांना म्हणाले, "ए भ**…ए उग्रवादी..तुला कधी उभं रहून बोलू देणार नाही. ए उग्रवादी..कटवे…हे दहशतवादी आहेत… उग्रवादी आहेत… हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं काही ऐकू नका, बाहेर फेका याला.” बिधुरी यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर देशभरातून टीका होत आहे. तसेच बिधुरी यांनी खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करूनही त्यांच्यावर लोकसभेच्या अध्यक्षांनी कारवाई केली नाही असं म्हणत विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. दरम्यान, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी रमेश बिधुरींच्या वक्तव्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. तसेच लोकसभा अध्यक्षांकडे याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. खासदार मोइत्रा यांनी रमेश बिधुरींच्या वक्तव्याचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच दोन ट्वीट केले आहेत. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुस्लीम आणि ओबीसींना शिव्या देणं हा भाजपाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्यातल्या बहुतेकांना यात काहीच गैर वाटत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या ट्वीटमध्ये टॅग करत खासदार महुआ मोइत्रा यांनी म्हटलं आहे की, भारतातल्या मुसलमानांना त्यांच्याच भूमीवर घाबरून राहायला भाग पाडलं जात आहे. ते हसतमुखाने हे सगळं सहन करत आहेत. मला माफ करा मी हे सगळं बोलू शकते कारण काली मातेनं मला त्यासाठी बळ दिलं आहे. हे ही वाचा >> “मी बोलावं इतकी आदित्य ठाकरेंची उंची नाही”, रामदास कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले… महुआ मोइत्रा यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना टॅग करत त्यांचा उल्लेख मर्यादापुरुष असा केला आहे. तसेच मोइत्रा यांनी म्हटलं आहे की तुम्ही माझ्याविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणण्यास मोकळे आहात. मी अशा कोणत्याही समितीला सामोरी जाण्यास तयार आहे. परंतु, त्याआधी मी तुम्हाला विचारते की तुम्ही रमेश बिधुरी यांच्याविरोधात काय कारवाई करत आहात?