बिल्किस बानो सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींची गुजरातच्या गोध्रा तुरुंगातून काही दिवसांपूर्वी मुक्तता करण्यात आली. या आरोपींना सोडले जाऊ नये, अशी भूमिका १४ वर्षांपूर्वी बिल्किस बानो प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायमूर्तींनी घेतली आहे. दोषींचं मिठाई आणि हारांनी स्वागत करणारे राजकारणी एका विचारधारेचे असल्याचे मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती यू.डी. साळवी यांनी व्यक्त केले आहे.

“ज्यांनी गर्भवतीवर बलात्कार केला…” बिल्किस बानो प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर जावेद अख्तर संतापले

ज्यांनी कोणी हा निर्णय घेतला आहे, त्यांनी पूनर्विचार करावा, असेही साळवी यांनी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून साळवी मंगळवारी निवृत्त झाले आहेत. “हे प्रकरण न्यायप्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यातून गेले होते. पुराव्यांच्या आधारेच ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आता सरकारने यावर काय विचार केला हा एक प्रश्न आहे”, असे साळवी म्हणाले. माफी देण्याचा अधिकार सरकारला आहे. मात्र, कोणताही निर्णय घेताना प्रत्येक घटकाचा विचार केला गेला पाहिजे. अन्यथा हे अयोग्य ठरेल. सरकार या सर्व प्रक्रियेतून गेले की नाही हे माहित नाही, असे साळवी यांनी म्हटले आहे.

माफीचा निर्णय घेताना ज्या न्यायमूर्तींकडे या प्रकरणाची सुनावणी झाली त्यांना सरकारने विचारले का? असा सवालही साळवी यांनी केला. “मी या संदर्भात काहीही ऐकले नाही. या प्रकरणाचा तपास सीबीआयने केला होता. अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेताना राज्य सरकारने केंद्र सरकारचा सल्ला घेणं आवश्यक आहे. हा सल्ला राज्य सरकारने घेतला का? घेतला असेल तर केंद्र सरकार काय म्हणाले?” अशी विचारणा साळवी यांनी केली आहे.

“दोषींचं स्वागत करणं अत्यंत चुकीचं कृत्य होतं. काहींना हे हिंदूत्व वाटत असेल किंवा त्यांनी हिंदू म्हणून तसं केलं असेल, तरीही ते चुकीचं आहे. दोषी ब्राम्हण होते, हेही म्हणणं चुकीचंच होतं”अशी टीका साळवी यांनी केली.

Bilkis Bano Case: सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोषींचे पुष्पहार घालून स्वागत, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयातील प्रकार

गुन्हेगारांना माफी देताना सरकारने पीडित आणि गुन्ह्याच्या स्वरुपाचा विचार केला पाहिजे. या प्रकरणात ते झालेलं दिसत नाही, असे साळवी म्हणाले. ज्या दोषींना सोडण्यात आलं त्यांच्या मध्ये अपराधाची भावना आहे का? त्यांनी यासाठी माफी मागितली का? ज्या प्रकारे या दोषींनी स्वागताचा स्वीकार केला त्यातून त्यांना अपराधी वाटत असल्याचं कुठेही भासलं नाही, अशी नाराजीही साळवी यांनी व्यक्त केली.