नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आमचा पराभव झाला, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. मात्र, जनतेने आम्हाला कौल दिला आहे. आम्ही हरलो नाही, हरणारी नाही, असे नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत निक्षून सांगितले. रालोआच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा केला. राष्ट्रपती भवनात रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजता मोदी आणि रालोआच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे.

संसदेच्या संविधान सदनामध्ये (जुने संसद भवन) शुक्रवारी ‘रालोआ’च्या भाजपसह सर्व घटक पक्षांचे नेते व खासदारांनी मोदींची आघाडीच्या नेतेपदी व लोकसभेच्या सभागृहनेतेपदी निवड केली. तसेच भाजपच्या खासदारांनी मोदींची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली. भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी हे तीन प्रस्ताव मांडले. ‘रालोआ’च्या नेतेपदाच्या प्रस्तावाला तेलुगु देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू व जनता दलाचे (सं) प्रमुख नितीश कुमार यांच्यासह इतर घटक पक्षनेत्यांनी अनुमोदन दिले. या निवडीनंतर केलेल्या भाषणात मोदी यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सत्तेसाठी एकत्र आलेल्या पक्षांची आघाडी नसून ‘राष्ट्र प्रथम’ या तत्वाशी बांधिलकी असलेली आघाडी आहे, असे म्हटले.

‘सरकार स्थापण्यासाठी बहुमत आवश्यक असते. मात्र देश चालवण्यासाठी सार्वमत आवश्यक असते. देशवासियांनी आपल्याला बहुमताने निवडून दिले असून आता एकमताने देशाला पुढे नेण्याचे काम आपण करायला हवे,’ अशी अपेक्षा मोदी यांनी व्यक्त केली. देशाच्या आघाडीच्या इतिहासातील सर्वाधिक भक्कम संख्याबळ असलेली ही आघाडी आहे, असे सांगताना ‘सर्व पंथ समभाव’ आणि परस्पर सामंजस्य ही मूल्ये या आघाडीचा कणा असतील, असेही मोदी म्हणाले.

‘आमच्यावरील संस्कारामुळे आम्ही यशाने हुरळून जात नाही. पराभूत झालेल्या व्यक्तीची खिल्लीही उडवत नाही. ही आम्हाला मिळालेली शिकवण आहे. निवडणुकीपूर्वी कोणाचे सरकार होते, आता कोणाचे आले हे एखाद्या मुलाला विचारा, तो राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणूनच उत्तर देईल,’ असे मोदींनी विरोधकांना सुनावले. दहा वर्षांनंतर काँग्रेसला शंभर जागाही जिंकता आल्या नाहीत असा टोला पंतप्रधानांनी लगावला.

सत्तास्थापनेचा दावा

रालोआच्या बैठकीनंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली ‘रालोआ’च्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेसाठी ‘रालोआ’चा पाठिंबा व्यक्त केला.या शिष्टमंडळात भाजपचे नेते राजनाथ सिंह, अमित शहा, अश्विनी वैष्णव, सी. एन. मंजूनाथ यांच्यासह चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार, एकनाथ शिंदे, एच. डी. कुमारस्वामी, चिराग पासवान, जीतन राम मांझी, पवन कल्याण, अजित पवार, अनुप्रिया पटेल, जयंत चौधरी, जोयंता बसुमतारी, अतुल बोरा, इंद्र हँग सुब्बा, सुदेश महतो, चंद्र प्रकाश चौधरी आणि रामदास आठवले या घटक पक्षनेत्यांचा समावेश होता. त्यानंतर सायंकाळी मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला.

मोदी नव्हे, ‘एनडीए’ सरकार!

संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात ‘एनडीए’च्या बैठकीसाठी मोदी आल्यानंतर भाजपच्या तमाम खासदारांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणा दिल्या. मात्र, सभागृहातील वातावऱण ‘आघाडी’मय झालेले पाहायला मिळाले. मोदींच्या भाषणाआधी जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा या तमाम भाजपनेत्यांनी मोदी सरकारऐवजी ‘एनडीए’ सरकार असा आवर्जून उल्लेख केला. केंद्रात सलग तिसऱ्यांदा आघाडीचे सरकार स्थापन होणार असून त्याचे नेतृत्व मोदी करत आहेत, असे नड्डा म्हणाले. मोदींनी भाषणामध्ये ‘एनडीए’ सरकारचा वारंवार उल्लेख केला. यापूर्वीची दोन सरकारेही ‘एनडीए’चीच होती असेही मोदी म्हणाले.

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. संसदेच्या संविधान सदन येथे शुक्रवारी ही बैठक झाली.

राज्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष नको’

● ‘‘समाजाच्या सर्व स्तरांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करताना प्रादेशिक आकांक्षा आणि राष्ट्रीय हितसंबंध समांतर चालले पाहिजे,’’ असे तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले.

●चंद्राबाबू आणि बिहारचे मुख्यमंत्री व संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली. राज्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करू नये याची आठवण करून दिली.

●राष्ट्रीय हितसंबंधांबरोबरच प्रादेशिक आकांक्षा महत्त्वाची असून त्यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे नमूद केले. मोदी भारताचा विकास करतील, त्याचबरोबर बिहारची सर्व प्रलंबित कामे केली जातील, असा आशावाद नितीश यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्या शपथविधी

‘रालोआ’ सरकारचा शपथविधी रविवार, ९ जून रोजी संध्याकाळी ७.१५ वाजता होईल. रालोआच्या नेतेपदी एकमताने निवड झाल्यानंतर शुक्रवारी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडे सरकार स्थापनेचा दावा केला. मुर्मू यांनी मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले आहे. त्यापूर्वी रालोआ नेत्यांनी मोदींना पाठिंबा देत असल्याचे पत्र राष्ट्रपतींना दिले. आम्ही मंत्र्यांची यादी राष्ट्रपतींकडे सुपूर्द करू, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी स्वीकारले आहे. बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मॉरिशस आणि सेशेल्स देशांच्या राष्ट्रप्रमुखांनाही शपथविधीचे निमंत्रण देण्यात आले आहे.