दिल्लीच्या महानगर पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच ईव्हीएममध्ये घोळ आहे अशी ओरड विरोधी पक्षातील नेते करत आहेत अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. विरोधी पक्ष प्रत्येक वेळी एक नवा मुद्दा शोधून काढतात आणि त्याद्वारे सर्वांचे लक्ष विचलित करू पाहतात असे ते म्हणाले. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी चर्चवर हल्ल्याचा मुद्दा शोधून काढला तर बिहार निवडणुकीच्या वेळी पुरस्कार परत केले गेले होते.

अशा मुद्दांवर चर्चा करुन ते प्रसिद्धी मिळवू पाहतात असे पंतप्रधानांनी म्हटले. प्रत्येक निवडणुकीमध्ये सातत्याने पराभव पत्करावा लागल्यामुळे विरोधी पक्ष नैराश्याने ग्रासला आहे असे ते म्हणाले. विरोधी पक्षांवर टीका करताना त्यांनी भाजप नेत्यांना काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. भाजप नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्ये टाळावीत असे ते म्हणाले. भावनेच्या भरात येऊन काही वादग्रस्त वक्तव्ये करणे टाळावे असे मोदींनी म्हटले. जर काही तुमच्या मनात शंका असतील किंवा काही तक्रारी असतील तर पक्षातील वरिष्ठ नेत्यांना बोलून दाखवाव्यात.

त्या माझ्या पर्यंत पोहचतील असे ते म्हणाले. भाजपला नुकताच झालेल्या निवडणुकीमध्ये यश मिळाले आहे. परंतु या यशाने हुरळून जाऊ नये असे ते म्हणाले. आपला विजय रथ आगेकूच कसा करत राहील असे पाहावे. भाजप लोकसभेतील १२० जागांसाठी विशेष मोहीम राबवणार आहे. या जागांवर भाजपला विजय मिळवता आला नाही किंवा त्यांना तिथे कमी मतदान पडले आहे अशा जागांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे असे ते म्हणाले.

पंजाब निवडणुकांमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर ईव्हीएममध्ये घोळ करण्यात आला होता अशी टीका आप नेत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला निवडणूक आयोगाने प्रत्युत्तर दिले होते. तुमच्या पराभवाची कारणे शोधा, आत्मपरीक्षण करा असा सल्ला निवडणूक आयोगाने दिला होता. तसेच काही दिवसानंतर ईव्हीएममध्ये घोळ करून दाखवा असे आव्हान आयोगाने दिले होते. या आव्हानाला केजरीवाल यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले मी आयआयटीमध्ये शिकलो आहे ईव्हीएममध्ये घोळ करण्याचे १० मार्ग मी दाखवू शकतो.