सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर रिक्त असलेल्या टाटा सन्सच्या अध्यक्षपदी गुरूवारी नटराजन चंद्रशेखरन यांची निवड करण्यात आली. नटराजन चंद्रशेखरन हे सध्या टाटा समूहातील टीसीएस या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. तामिळनाडूच्या मोहनूर येथे जन्मलेल्या एन. चंद्रशेखरन यांनी स्थानिक महाविद्यालयातून कम्प्युटर अॅप्लिकेशन या विषयात मार्स्टसची पदवी घेतली. १९८७ साली ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (टीसीएस) रुजू झाले. त्यानंतर उत्तरोत्तर प्रगती करत ते २००९ मध्ये ते टीसीएसचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. मिस्त्री यांच्या गच्छंतीनंतर टाटा सन्सच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत आले होते. चंद्रशेखरन हे काही काळासाठी सेंट्रल बँकेच्या संचालक मंडळावरही कार्यरत होते. उद्योगविश्वात ते चंद्रा या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत. एन. चंद्रशेखरन यांनी टाटा समूहाच्या ‘मुकूटातील हिरा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीसीएसचे सीईओ म्हणून त्यांच्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवून दिली होती. त्यांच्या नेतृत्त्वाखाली टीसीएसने २०१५-१६ या आर्थिक वर्षात १६५० कोटींचा नफा कमावला होता. चंद्रशेखरन यांच्याच काळात टीसीएस भारतामध्ये खासगी क्षेत्रात सर्वाधिक कर्मचारी असलेली कंपनी बनली. या काळात टीसीएसमध्ये तब्बल ३,५३,००० इतके कर्मचारी होते. तसेच स्पर्धेच्या काळातही चंद्रशेखरन यांच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांचे कंपनी सोडून जाण्याचे प्रमाणही कमी होते.
उद्योग क्षेत्रातील त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार आणि मानसन्मान मिळाले आहेत. २०१५-१६ साली दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेतील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राच्या बैठकीचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. याशिवाय, २०१२-१३मध्ये त्यांनी नासकॉम या संघटनेचे प्रमुखपद भुषविले असून सध्यादेखील ते नासकॉमच्या देखभाल कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सतर्फे आशियातील सर्वोत्कृष्ट सीईओंसाठी देण्यात येणाऱ्या पुरस्काराचेही ते पाचवेळा मानकरी ठरले आहेत. २०१४ मध्ये सीएनबीसी टीव्ही-१८ तर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारतातील आदर्श उद्योगपती म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. याशिवाय, याचवर्षी सीएनएन- आयबीएनतर्फे त्यांना इंडियन ऑफ द इयर या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. चंद्रा यांना हैदराबादच्या जेएनटीयू आणि हॉलंडमधील आघाडीच्या बिझनेस स्कूल्सपैकी एक असणाऱ्या न्याईनरोड या शिक्षण संस्थांकडून मानद डॉक्टरेट देऊन गौरविण्यात आले आहे. याशिवाय, चंद्रशेखरन हे हौशी छायाचित्रकार असून ते उत्तम धावपटूही आहेत. त्यांनी अॅमरस्टॅडम, बोस्टन, शिकागो, बर्लिन, मुंबई, न्यूयॉर्क, पॅराग्वे, स्टोकहोम, टोकियो अशा मॅरेथॉन स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
सायरस मिस्त्री यांना टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविल्याच्या तीन महिन्यानंतर चंद्रशेखरन यांची निवड झाली आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षाची निवड २४ फेब्रुवारीपर्यंत करण्यात येणार होती. पण आज अचानक मुंबईत संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. टाटा सन्सचा अध्यक्ष निवडण्यासाठी पाच सदस्यांचे एक पॅनल नेमण्यात आले होते. यात रतन टाटा यांच्यासह संचालक मंडळातील तिघांचा समावेश होता. विशेष म्हणजे ‘टाटा’च्या १५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगर-पारशी व्यक्ती निवडण्यात आली आहे.